नवी दिल्ली : देशातील राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय? हे अनेकांना पडलेलं मोठं कोडं. या कोड्याचे उत्तर इच्छा असूनही भल्याभल्यांना मिळवता आले नाही. असे असले तरी, कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे. याची माहिती मात्र नक्कीच पुढे आली आहे. जाणून घ्या राजकीय पक्षांची एकूण संपत्ती किती...?
देशातील एकूण राजकीय पक्षांमध्ये संपत्तीच्या बाबतीतही भाजपने जोरदार विकास केला आहे. देशातील सर्वच राजकीय पक्षात अव्वल ठरत भाजपने ८९३.८८ कोटी रूपयांची संपत्ती जमा केली आहे. भाजपच्या संपत्तीवर नजर टाकता ती गेल्या १० ते ११ वर्षांत अनेक पटींनी वाढलेली दिसते. सन २००४-५ मध्ये भाजपची एकूण संपत्ती १२२.९३ कोटी रूपये इतकी होती. हीच संपत्ती २०१५-१६ मध्ये ८९३.८८ कोटी इतकी झाली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात तब्बल ६ हून अधिक दशके सत्तेत राहिलेला राष्ट्रीय पक्ष कॉंग्रेसकडे मोठ्या प्रमाणावर संपत्ती आहे. भाजप खालोखाल कॉंग्रेस दुसऱ्या स्थानावर असून, कॉंग्रेसची एकूण संपत्ती ७५८.७९ कोटी इतकी आहे. २००४-०५ मध्ये कॉंग्रेसची संपत्ती १६७.०५ इतकी होती. जी २०१५-१६ मध्ये ७५८.७९ कोटी रूपयांवर पोहोचली आहे.
भाजप, कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षानंतर संपत्तीच्या बाबतीत आघाडी घेतली आहे की, मायावती यांच्या बहुजन समाजवादी पक्षाने. बसपाकडे एकूण ५५९ कोटी रूपये इतकी संपत्ती आहे. याच बसपाकडे दहा वर्षांपूर्वी केवळ ४३ कोटी रूपये इतकी संपत्ती होती हे विशेष.
डाव्यांच्या अभेद्य गडात सत्तेचे फूल फूल उमलवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसनेही आर्थिक संपत्तीत लक्षवेधी आघाडी घेतली आहे. एक दशकापूर्वी केवळ २५ लाख रूपये संतत्तीचा मालक असलेला हा पक्ष सध्या ४५ कोटी रूपयांची संपत्ती बाळगून आहे. तृणमूलची आर्थिक भरारी ही २०१५-१६ पर्यंत ४४.९९ टक्क्यांनी वाढली आहे.
संपत्तीच्या केंद्रीकरणाला नेहमी विरोध करणाऱ्या डाव्यांनाही संपत्तीचे फारसे वावडे नाही. इतरांच्या तुलनेत ते काहीसे मागे आहेत इतकाच काय तो फरक. माकप अर्थातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडे असलेल्या संपत्तीतही गेल्या ११ वर्षात तब्बल ३८३ टक्क्यांची वाढ झाली आहे. २००४-०५ मध्ये माकपची संपत्ती ९०.५५ कोटी इतकी होती. तर, २०१५-१६ मध्ये संपत्तीचा हाच आकडा ४३७.७८ कोटींवर पोहोचला आहे.
राष्ट्रीय राजकारणात अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या संपत्तीचा वेग काहीसा मंदावलेला दिसतो. २००४-०५ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे १.६ कोटी इतकी संपत्ती होती. राष्ट्रवादीकडे असलेल्या याच संपत्तीचा आकडा २०१५-१६ मध्ये १४.५४ कोटींवर गेला आहे.
दरम्यान, राजकीय पक्षांच्या संपत्तीबाबत असलेले हे सर्व आकडे हे असोसिएशन फॉर डेमोक्रॉटिक रिफॉर्म्स अँड इलेक्शन वॉचने (एडीआर) जाहीर केलेल्या माहितीवर आधारलेले आहेत. तसेच, हे आकडे हे केवळ फिक्स्ड असेट्स अर्थात स्थावर संपत्तीचे आहेत. या राजकीय पक्षांकडे असलेल्या इतर संपत्तीबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.