लखनऊ : भाजपमध्ये चौकीदाराचे महत्त्व किती वाढले आहे याबाबतची ही बातमी. उत्तर प्रदेशातील हरदोई मतदारसंघाचे विद्यमान खासदार अंशूल वर्मा यांचे तिकीट भाजपने कापले. यामुळे नाराज खासदारांनी आपला राजीनामा चक्क पक्ष कार्यालयातल्या चौकीदाराकडे सुपूर्द केला. एवढेच नव्हे तर राजीनाम्यासोबत त्यांनी चौकीदाराला १०० रूपये बक्षिस दिले. आपण अनेक विकासकामे केली. मात्र तरीही मला उमेदवारी नाकारण्यात आली. माझं नाव अंशूल असून, मी नावापुढे चौकीदार लावणार नाही, असेही त्यांनी संतापून सांगितले. ते सध्या समाजवादी पार्टीच्या संपर्कात असल्याचं समजत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही मंत्री पंकजा मुंडे यांनी चौकीदार नावाआधी लावले होते. मात्र, त्यांनी त्यांनी चौकीदार शब्द हटवला.
भारतीय जनता पार्टीत सध्या सगळेच चौकीदार बनलेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार असे बिरूद लावले आहे. त्यामुळे भाजपमध्ये चौकीदारांचे महत्त्व किती वाढले आहे, हे वेगळे सांगायला नको. म्हणूनच की काय, उत्तर प्रदेशातील हरदोईचे विद्यमान खासदार अंशूल वर्मा यांनी थेट चौकीदाराकडेच आपला राजीनामा सोपवला.
हरदोईमधून वर्मा यांचे तिकीट भाजपने यावेळी कापले. त्यामुळे नाराज खासदार महोदय भाजप कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपला राजीनामा चक्क चौकीदाराकडे सुपूर्द केला. राजीनाम्यासोबत त्यांनी चौकीदाराला १०० रूपये बक्षिस दिले. एवढेच नव्हे तर मोदी-शाह बोगस चौकीदार असल्याची घणाघाती टीकाही केली.
यापुढे आपल्या नावापुढे चौकीदार लावणार नाही, असे अंशूल वर्मा यांनी जाहीर केले आहे. ते सध्या समाजवादी पार्टीच्या संपर्कात असल्याचं समजत आहे. मात्र राजकीय भवितव्याबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. आधीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नोटीशीमुळे भाजपची 'मै भी चौकीदार हूँ' मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यात आता नाराज खासदारांनी चौकीदाराकडे राजीनामा सोपवल्याने भाजपच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.