नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील भाजप आणि पिपल्स डेमोक्रेटीक पार्टीची युती संपुष्टात आली आहे. भाजपने आज पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केल्याने, मेहबुबा मुफ्ती सरकार गडगडलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपने केली आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत भाजपने आज ही घोषणा केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जम्मू-काश्मीरच्या भाजप नेत्यांची चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. मेहबुबा मुफ्ती आज सायंकाळी राजीनामा राज्यपालांना सोपवणार आहेत.
काश्मीरमध्ये अशांतता वाढीस लागली आहे, या स्थितीला मेहबुबा मुफ्ती जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. वाढत्या हिंसाचारामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं भाजपने म्हटलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्याकाळात शांततेऐवजी कट्टरवाद वाढीस लागला, आणि यामुळे काश्मीर आणखी अशांत झाला, म्हणून यापुढे मुफ्ती सरकारचा पाठिंबा आम्ही काढून घेत आहोत. मेहबुबा मुफ्ती काश्मीर नीट सांभाळू शकल्या नाहीत, असा देखील आरोप भाजपने केला आहे.
आम्ही राज्य सरकारमध्ये आमचे उपमुख्यमंत्री कविंद्र गुपात आणि इतर सर्व मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वसंमतीनं हा निर्णय घेतलाय. आम्ही राज्यात पीडीपीसोबत युतीत तीन वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी जनादेश कोणत्याही एका पक्षाला नव्हता. आम्ही राज्यात योग्य प्रशासन चालण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले. सरकारचे दोन उद्देश्य होते. पहिला म्हणजे शांती आणि दुसरा राज्यातील प्रमुख भागातील विकासकामांना गती देणं, असंही राम माधव यांनी यावेळी म्हटलंय.
काश्मीरमध्ये पीडीपीकडे २८ जागा आहेत, भाजपकडे २५ आहेत, तर नॅशनल कॉन्फ्रन्सकडे १५ जागा आहेत. तर काँग्रेसकडे १२ जागा आहेत.