बिहारमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्यातून सोफा, पाण्याचे नळ, वॉश बेसिन, एअर कंडिशनर, ट्यूबलाईट, बेड गायब झाल्याचा दावा भाजपाने केला आहे. हा बंगला तेजस्वी यादव यांच्या ताब्यात होता. हे सर्व सामान चोरी झालं असावं अशी शक्यता वर्तवली जात आहे. तेजस्वी यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलाने यावर व्यक्त होताना भाजपाला संपूर्ण यादी जाहीर कऱण्यास सांगितलं आहे.
नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये असताना तेजस्वी यादव यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होतं. उपमुख्यमंत्री असल्याने त्यांना हा बंगला देण्यात आला होता. हा बंगला त्यांनी रिकामा केला असून, नवे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आता तिथे वास्तव्यास जाणार आहे. पाटणा येथे असणाऱ्या या बंगल्यात ते जाण्याआधीच ही घडामोड समोर आली आहे. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर ते घऱात प्रवेश कऱणार आहेत.
"उपमुख्यमंत्र्यांच्या घरातील सामान कसे लुटले गेले, हे आम्ही समोर आणत आहोत. सुशील मोदी जेव्हा या घरात स्थलांतरित झाले तेव्हा तेथे दोन हायड्रॉलिक बेड होते, पाहुण्यांसाठी सोफा सेट होते. सर्वांना हे सोफा दिसतील अशा ठिकाणी होते. त्या सर्व गोष्टी गहाळ आहेत,” असं सम्राट चौधरींचे स्वीय सचिव शत्रुघ्न प्रसाद यांनी आयएएनएसला सांगितलं.
"20 पेक्षा जास्त स्प्लिट एसी गायब आहेत. ऑपरेटिंग रूममध्ये एकही कॉम्प्युटर किंवा खुर्ची नाही. स्वयंपाकघरात फ्रीज किंवा आरओ नाही. भिंतीवरून दिवेही नेण्यात आले आहेत," असं त्यांनी पुढे सांगितलं. आरजेडीने आपल्या बचावात भाजपाला भवन निर्माण विभागाला यादी जाहीर करण्यास सांगितलं आहे. तसंच त्यात अपयशी ठरल्या माफी मागावी अशी मागणी केली आहे.
"बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याने 5 देशरतन मार्गावरील बंगला रिकामा केला आहे. भवन निर्माण विभागाने यादी जाहीर केली पाहिजे. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. मीडियासह आमचे लोकही व्हिडीओही बनवत होते. आम्ही तुम्हाला आव्हान देतो की एक तर तुम्ही यादी जाहीर करा किंवा माफी मागा,” असं आरजेडीचे राष्ट्रीय प्रवक्ते शक्ती यादव म्हणाले.
या वादात उडी घेत बिहारमधील बेगुसरायचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही आरजेडी नेतृत्वावर टीका केली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील 'चोरी'चे प्रमाण स्थापित करण्यासाठी तपशीलवार चौकशीची मागणी केली.
"सम्राट चौधरी यांना हा बंगला देण्यात आला आहे आणि ते नवरात्रीमध्ये या घरात स्थलांतरित होणार होते. वॉश बेसिन, पाण्याचे नळ आणि फर्निचर यांसारख्या आवश्यक वस्तू गायब आहेत. हायड्रोलिक बेड काढून घेण्यात आला आहे. बॅडमिंटन कोर्टमधील मॅट काढून घेण्यात आली आहे. व्यायामशाळा रिकामी आहे, तिथे कोणतीही मशीन नाही. फाऊंडेशनचे दिवे काढलेल आहेत," असा दावा बिहार भाजपाचे मीडिया प्रभारी दानिश इक्बाल यांनी परिसराची पाहणी केल्यानंतर दावा केला.