नवी दिल्ली : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असताना, नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक सुरूय. भाजपाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांची सह संघकार्यवाह गोपाळ कृष्ण यांच्याशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेबाबत तसंच आर्थिक स्थितीबाबत त्यांच्यात बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकीकडे राज्यात घडामोडी पाहायला मिळत आहे, तर दुसऱीकडे दिल्लीत ही बैठकांवर बैठका होत आहे. भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाने राज्यातील नेत्यांकडेच युतीची जबाबदारी सोपवल्याने आता शिवसेनेसोबत सुरु असलेला संघर्ष भाजपचे नेते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भाजप-शिवसेनेमधील दरी रोज वाढत असताना दिसते आहे. शिवसेनेसोबत अजून कोणतीही चर्चा झालेली नाही.
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा, अशी ठाम भूमिका शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत घेण्यात आली. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला प्राधान्य असेल. मात्र भाजपनं मुख्यमंत्रिपदाची अट मान्य केली नाही तर अन्य पर्यायांचा विचार स्वीकारला जाईल, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आल्याचं समजतं आहे. स्वतःहून युती तोडण्याची इच्छा नाही. भाजपनं जे ठरलंय त्याप्रमाणं करावं. भाजपनं निर्णय घ्यावा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितलं.
दरम्यान, शिवसेनेच्या सर्व आमदारांना तसंच शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना तूर्तास वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मातोश्रीवरील बैठक आटोपून शिवसेना आमदार रंगशारदाला पोहोचलेत.. भाजपनं अडीच वर्षांसाठी शिवसेना मुख्यमंत्रिपद द्यावं, अन्यथा पाच वर्षं शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असं शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं.