बीकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेस अपघाताचं धक्कादाय कारण, तपासात मोठा खुलासा

जानेवारी महिन्यात बीकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला होता, यात ९ जणांचा मृत्यू झाला होता, या अपघाताचं कारण आता समोर आलं आहे  

Updated: Feb 11, 2022, 08:57 PM IST
बीकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेस अपघाताचं धक्कादाय कारण, तपासात मोठा खुलासा title=

Bikaner-Guwahati Express Accident : पश्चिम बंगालमधील (West Bengal) जलपाईगुडी इथं गेल्या महिन्यात झालेल्या रेल्वे अपघातात रेल्वे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. 13 जानेवारीला बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. आता जवळपास महिनाभरानंतर त्या अपघाताचा तपास अहवाल समोर आला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

निष्काळजीपणामुळे रेल्वे अपघात
अहवालानुसार, बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसने अपघातापूर्वी सुमारे 18 हजार किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं होतं. वास्तविक 4500 किलोमीटर अंतर कापल्यानंतर ट्रेनचं इंजिन तपासणी आणि दुरुस्त करण्याची जबाबदारी रेल्वेची असते. 6 डिसेंबर 2021 रोजी रेल्वे इंजिनची शेवटची सुरक्षा तपासणी करण्यात आली होती. यानंतर अपघात होईपर्यंत ट्रेन 18 हजार किमी कोणत्याही दुरुस्तीशिवाय धावली होती.

नियमांनुसार प्रत्येकी 4500 किमी अंतरावर WAP4 श्रेणीच्या ट्रेन इंजिनची सुरक्षा तपासणी करणं आवश्यक असतं. पण बिकानेर-गुवाहाटी एक्सप्रेसच्या इंजिनची अशी कोणतीही तपासणी करण्यात आली नव्हती. 

ट्रेनच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ट्रेनच्या इंजिनची सुरक्षा तपासणी करणं महत्वाचं असतं. यामध्ये, रेल्वेचे अधिकारी इंजिनच्या अंडरगियरपासून सर्व सुरक्षा तपशीलांची बारकाईने तपासणी करतात.

तपासात असं समोर आले आहे की, इंजिनच्या चाचणीसाठी समस्तीपूर विभागाकडून न्यू कूचबिहार आणि आग्रा फोर्ट दरम्यान इंजिनची तपासणी करणं अपेक्षित होतं. पण या दोन्ही ठिकाणी तपासणी करणारी व्यवस्थाच उपलब्ध नाही.