Groom Forget To Attend His Own Wedding: लग्नाच्या दिवशीच लग्न मोडण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. कधी लग्नाला झालेला उशीर तर कधी लग्नाच्या ऐन मुहूर्तावर मुलाकडून करण्यात आलेली हुंड्याची मागणी यासारख्या कारणांमुळे अनेकदा लग्नं मोडली आहेत. तर कधी दारुच्या नशेत आलेला नवरा आणि कधी नवरीला कमी मार्क असल्याने लग्न मोडल्याचे प्रकारही समोर आले आहेत. लग्न मोडण्यासाठी काहीही कारणं चालतं असं वाटावं इतक्या थिल्लर कारणांमुळे लग्नं मोडली आहेत. असाच एक अगदीच विचित्र प्रकार नुकताच बिहारमध्ये घडला आहे.
बिहारमधील भागलपुर येथील सुल्तानगंज गावामध्ये नुकतंच एक लग्न लग्नाच्या दिवशीच मोडलं. सोमवारी आपलं लग्न आहे हे नवरदेवच विसरला. आदल्या दिवशी रात्रीपासून लग्नाच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत लग्नापूर्वीच्या सेलिब्रेशनमध्ये प्रचंड प्रमाणात मद्यप्राशन केल्याने या नवरदेवाला स्वत:च्याच लग्नाला विसर पडला. त्यामुळे आयुष्यातील आपल्या सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असलेल्या लग्नाच्या दिवशीच हा नवरदेव शुद्ध हरपून झोपून राहिला आणि स्वत:च्याच लग्नाला जायला विसारला.
लग्नाच्या दिवशी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे नवरदेव वरात घेऊन मुलीला घ्यायला येईल या प्रतिक्षेत मुलीसहीत तिच्याबरोबर तिचे सर्व नातेवाईक नवऱ्या मुलाची वाट पाहत होते. मात्र नवरा मुलगा आलाच नाही. नवरदेवाला सोमवारी पहाटे डोळा लागल्यानंतर तो थेट मंगळवार सुरु झाल्यानंतर म्हणजेच मध्यरात्रीनंतर शुद्धीवर आला. मंगळवारी पहाटेच हा तरुण मुलीच्या घरी पोहोचला. मात्र आदल्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे गाववाल्यांसमोर नाचक्की झाल्याने मुलीकडचे प्रचंड नाराज झाले होते. मुलीनेही लग्नास नकार दिला. ज्या मुलाला स्वत:च्या जबाबदाऱ्यांचं भान नाही अशा मुलाबरोबर मला लग्न करण्याची इच्छा नाही असं या मुलीने तिच्या नातेवाईकांना सांगितलं. मुलीच्या घरच्यांनीही घडलेला प्रकार आणि मुलाला लग्नाचं गांभीर्य नसल्याचं पाहून मुलाच्या नातेवाईकांकडे लग्नासाठी केलेल्या खर्चापैकी अर्धा खर्च मागून लग्न रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला.
मुलाकडील नातेवाईकांनी मुलीकडच्यांची अर्धा खर्च देण्याची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर मुलीकडच्या नातेवाईकांनी मुलाकडील काही नातेवाईकांना ताब्यात घेतलं. यानंतर मोठा वाद झाला आणि अखेर पोलिसांना यामध्ये दखल घ्यावी लागली. पोलिसांनी मध्यस्थी करुन प्रकरण सोडवलं. पोलिसांच्या मध्यस्थीने लग्न मोडण्यावर एकमत झालं आणि न झालेल्या लग्नाचा खर्च वाटून घेण्याचंही ठरलं.
काही दिवसांपूर्वी आसाममध्येही लग्नादरम्यान नवरा मुलगा दारुच्या नशेत झोपल्याने लग्नमंडपातच लग्न मोडल्याचा प्रकार घडला होता. मुलीने आणि मुलीच्या बापाने असा बेवडा नवरा नको म्हणत लग्न मोडलं होतं.