पाणीपुरी खायला गेलेल्या मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; दुकानदाराचाही घेतला जीव

Bihar Crime : बिहारमध्ये शनिवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी एका दुकानाबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शिक्षक आणि दुकानदाराचा समावेश आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 18, 2023, 03:48 PM IST
पाणीपुरी खायला गेलेल्या मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; दुकानदाराचाही घेतला जीव title=

Bihar Crime : दुहेरी हत्याकांडाने (double murder) बिहारचा (Bihar News) सुपौल जिल्हा हादरून गेला आहे. सुपौलमध्ये बाईकवरुन आलेल्या आरोपींनी गोळ्या झाडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एका दुकानाबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शिक्षक आणि दुकानदाराचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारांचे खरे लक्ष्य शिक्षक होते, अशी माहिती समोर येत आहे. दुकानदार चुकून मारला गेल्याचे म्हटलं जात आहे.

गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. घाईगडबडीत काही स्थानिक लोकांनी दोघांनाही उपचारासाठी पिपरा आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. मोहम्मद नुरुल्ला (42) असे मृत शिक्षकाचे नाव आहे तर सिकंदर दास असे 40 वर्षीय दुकानदाराचे नाव आहे. सिकंदरच्या डोक्यात दोन गोळ्या लागल्या आहेत. त्याचवेळी शिक्षक मोहम्मदला तीन वेळा गोळ्या लागल्या आहेत. दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नुरुल्ला हे रात्रीच्या जेवणानंतर पाणीपुरीचा खाण्यासाठी दुकानात गेले होते तेव्हा त्यांची आणि दुकानदाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर सिंकदर यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, "आम्ही घरातच होतो. त्यावेळी अचानक मोठा आवाज झाला आणि आम्हाला वाटले की दुकानात लावलेला बल्ब फुटला. पण आम्ही बाहेर आलो तर दोघेही दारात पडलेले होते. हल्लेखोर कोण होते हे आम्हाला समजू शकले नाही. त्यांचे कोणाशीही वैर नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले, त्यांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात आणले, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. मोहम्मदला तीन तर सिकंदरच्या डोक्यात दोन गोळ्या लागल्या होत्या. बाहेर जाऊन पाहतो तोपर्यंत गुन्हेगार बाईक सुरू करून पळून गेले होते."

दरम्यान, मृत नुरुल्लाचा भाऊ मोहम्मद फिरोजने सांगितले की त्याचा भाऊ हा रामपूर मिडल स्कूलमध्ये मुख्याध्यापक होता. घरी जेवल्यानंतर बाहेरून फिरून येतो असे सांगून तो निघला होता. त्याचवेळी नुरुल्लावर गोळी झाडण्यात आली. स्थानिक पोलिसांनी रुग्णालयात पोहोचल्यानंतर प्रकरणाचा आढावा घेतला. पोलिसांकडून घटनास्थळाची सर्व बाजूंनी बारकाईने तपासणी करण्यात येत असून, लवकरच या घटनेत सहभागी असलेल्या गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.