तीव्र उन्हामुळे मुलाचा मृत्यू, मृतदेह घेऊन कुटुंबाची फरफट... अ‍ॅम्ब्युलन्सही मिळाली नाही

India Heat Stroke : देशभरात सूर्याचा प्रकोप झाला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. दिल्ली, बिहार, राजस्थानमध्ये उन्हामुळे लोकं बेशुद्ध होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशात एक धक्कादाक बातमी समोर आली आहे. 

राजीव कासले | Updated: May 30, 2024, 07:35 PM IST
तीव्र उन्हामुळे मुलाचा मृत्यू, मृतदेह घेऊन कुटुंबाची फरफट... अ‍ॅम्ब्युलन्सही मिळाली नाही title=

India Heat Stroke : देशभरात तापमानाचा पारा वाढला आहे.  महाराष्ट्रासह काही राज्यात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय. दुपारच्या वेळेत उन्हाच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानामुळे प्रचंड उकाडा जाणवू लागलाय (Heat Wave) आरोग्य विभागाकडून सावधानतेचा इशाराही देण्यात आलाय. दिल्ली, बिहार, राजस्थानमध्ये उन्हामुळे लोकं बेशुद्ध होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशात एक धक्कादाक बातमी समोर आली आहे. बिहारमधल्या बेगूसराय (Begusarai) इथं तीव्र उन्हामुळे एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. भीषण उन्हामुळे मुलाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात आणण्यात आलं. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. 

पण मृत्यूनंतर रुग्णालयकाडून त्या मुलाच्या मृतदेहाची हेळसांड करण्यात आली. रुग्णालयाकडून मुलाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सही देण्यात आली नाही. त्यामुळे मुलाचा मृतदेह खांदयावर घेऊन कुटुंबिय वणवण भटकत राहिले. 

बेगूसरायमधल्या रजौडा गावात राहाणाऱ्या राजनिती राय यांच्या 12 वर्षांचा मुलगा आयुष कुमारला तीव्र उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी आयुषला तात्काळ उपचारासाठी सदर रुग्णालयात आणलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृत्यूनंतर कुटुंबियांनी मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णालयाकडे अ‍ॅम्ब्युलन्स देण्याची विनंती केली. पण रुग्णालयाकडून त्यांना कोणतीही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. 

मुलाचे वडील मृतदेह घेऊन रुग्णालायच्या बाहेर वणवण फिरत होते, पण त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. अखेर एका ई-रिक्षाने मुलाचा मृतदेह घेऊन जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

रुग्णालयाचं धक्कादायक उत्तर
याप्रकरणई बेगूसरायचे सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद कुमार सिंह यांनी धक्कादायक उत्तर दिलं. मुलाला मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण रुग्णालय इमारतीचं काम सुरु असल्याने अॅम्ब्युलन्स दुसरीकडे ठेवण्यात आली होती, असं कारण डॉ प्रमोद कुमार सिंह यांनी दिलं. इतकंच नाही तर अॅम्ब्युलन्स लगेच उपलब्ध करुन द्यायला त्याचा चालक इंजिन स्टार्ट करुन बसलेला नसतो असं संतापजनक उत्तरही डॉ. सिंह यांनी दिलं.

मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी थोडा वेळ वाट पाहायला हवी होती, अॅम्ब्युलन्स न देण्याचा खोटा आरोप मृत मुलाच्या कुटुंबियांकडून केला जात असल्याचंही डॉ. सिंह यांनी सांगितलं. 

दिल्लीत सर्वाधिक तापमान
दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरली आहे. दिल्लीतल्या मुंगेशपूरमध्ये बुधवारी 52.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झआली. दिल्लीच्या इतिहासात आतापर्यंतचा हा सर्वात उष्ण दिवस ठरला.