नवी दिल्ली : गाडी चोरणारे अनेक चोर आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागले आहेत. पण आता पोलिसांच्या हाती सर्वात मोठा कार चोर हाती लागला आहे. या चोराकडून पोलिसांनी तब्बल 5 हजार कार जप्त केल्या आहेत. इतक्या मोठ्या गाड्या चोरल्याचं ऐकूण अनेकांना धक्का बसला.
दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा मोठा चोर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. देशातील सर्वात मोठा कार चोर अनिल चौहान याला पोलिसांनी अटक केली. अनिलवर 27 वर्षात 5000 गाड्या चोरल्याचा आरोप आहे. अनिलवर याशिवाय हत्या ,आर्म्स अॅक्ट आणि तस्करीचे गुन्हे देखील नोंद आहेत.
स्पेशल टीमने अनिल चौहान याला आसाममधून अटक केलीये. तो 27 वर्षापासून गुन्हेगारी जगात वावरत आहे. 1990 दरम्यान त्याने जवळपास 800 मारुती गाड्या चोरल्या होत्या. अनिलने जम्मू काश्मीर, नेपाळ आणि अनेक राज्यांमध्ये चोरी केलेल्या कार विकल्या आहेत.
आसाम पोलिसांनी 7 वर्षापूर्वी त्याला अटक केली होती. तेव्हा त्याच्यावर 4 हजाराहून अधिक कार चोरल्याचा आरोप होता. अनिल चौहानचं नेटवर्क दिल्लीसह महाराष्ट्रापर्यंत पसरलं आहे. त्याच्यावर साडेतीन हजाराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
अनिल चौहान 1990 मध्ये दिल्लीत रिक्षा चालक होता. त्यानंतर तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. कार चोरी करुन विकणाऱ्या अनिलने भरपूर संपत्ती जमवली. ईडीने त्याच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. हत्यारांची तस्करी करण्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे.