'अंशुमनचं किर्तीचक्र घेऊन सून माहेरी गेली आणि...', शहीद जवानाच्या आई- वडिलांचा गंभीर आरोप

Captain Anshuman Singh Wife : वीर जवानाला मरणोत्तर हा सन्मान प्रदान केल्यानंतर काही दिवसांतच समोर आली लक्ष वेधणारी बातमी. किर्तीचक्र घेऊन सुनबाई माहेरी गेल्याचा खुलासा करत आई- वडिल म्हणाले....   

सायली पाटील | Updated: Jul 12, 2024, 08:23 AM IST
'अंशुमनचं किर्तीचक्र घेऊन सून माहेरी गेली आणि...', शहीद जवानाच्या आई- वडिलांचा गंभीर आरोप  title=
big news Captain Anshuman Singhs parents claim daughter in law took Kirti Chakra with her at her parents home

Captain Anshuman Singh Wife : लष्कराच्या सियाचिन येथील तळावर आपल्या सहकाही जवानांचा जीव वाचवत जीवनावश्यक सामग्री इतरांसाठी पोहोचावी म्हणून ती हानिग्रस्त होऊ नये यासाठी कॅप्टन अंशुमन सिंह यांनी आपले प्राण पणाला लावले. अद्वितीय साहस दाखवत त्यांनी केलेल्या या कार्याला संपूर्ण देशानं सलाम केलं. याच प्रयत्नांमध्ये कॅप्टन सिंह शहीद झाले. त्यांच्या या कर्तव्यतत्परतेप्रती भारत सरकारकडून 5 जुलै 2024 रोजी कॅप्टन सिंह यांना मरणोत्तर किर्तीचक्र हा बहुमान प्रदान करण्यात आला. 

राष्ट्रपती भवनाच्या दरबार सभागृहात पार पडलेल्या शासकीय सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा बहुमान प्रदान केला. ज्याचा स्वीकार कॅप्टन सिंह यांच्या पत्नी आणि त्यांच्या मातोश्रींनी केला. ज्यानंतर देशभरात कॅप्टन सिंह यांच्या पत्नीसोबतच त्यांच्या प्रेमकहाणीचीसुद्धा चर्चा झाली. पण, या चर्चांमध्येत आता एक नवी बाब समोर येत आहे. 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार दिवंगत कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई- वडिलांनी काही धक्कादायक गोष्टी समोर आणत आपल्या मनातील व्यथा बोलून दाखवली. कॅप्टन सिंह यांच्या आई- वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार त्यांची पत्नी स्मृती पतीचे फोटो अल्बम, कपडे आणि त्यांच्याशी संबंधित इतर सर्व आठवणींसह इतकंच नव्हे तर, सरकारकडून देण्यात आलेल्या किर्तीचक्रसह गुरदासपूर येथे आपल्या माहेरी निघून गेल्या आहेत. 

शहीद कॅप्टन सिंह यांच्या आईवडिलांच्या माहितीनुसार त्यांच्या पत्नी फक्त किर्तीचक्र पदकच नव्हे, तर त्यांच्याशी संबंधित आठवणी सोबत नेल्या असून, त्यांनी सर्व कागदपत्रांमधील निवासी पत्ता बदलून तिथं गुरदासपूर येथील पत्ता दिला आहे. दरम्यान, शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आईवडिलांकडून होणाऱ्या या आरोपांसंदर्भात अद्यापही स्मृती सिंह यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नसून, त्या आपली बाजू मांडत नेमकं काय म्हणतात ही बाबही तितकीच महतत्वाची असेल. 

मोठ्या धुमधडाक्यात लग्न लावून दिलं आणि... 

शहीद कॅप्टन सिंह यांचे वडील, राम प्रताप सिंह यांनी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपण मुलाच्याच म्हणण्यानुसार त्याचं लग्न स्मृतीशी लावून दिलं होतं. धुमधडाक्यात लग्न झालं. स्मृती आणि आमच्या कुटुंबानं लग्नात जीव ओतला होता. लग्नानंतर स्मृती नोएडामध्ये बीडीएसच्या शिक्षणासाठी त्यांच्या लेकीसोबतच फ्लॅटमध्ये वास्तव्यास आल्याचं म्हटलं. 

'19 जुलै 2023 रोजी जेव्हा आमचा मुलगा शहीद झाला तेव्हा, स्मृती आणि आमची मुलगी नोएडामध्येच होती. मी स्वत: त्यांना कॅबनं लखनऊला बोलवून यगेचलं आणि आम्ही तिथून गोरखपूरला गेलो. जिथं अंशुमनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण श्राद्धाच्या (तेरहवी) दुसऱ्याच दिवशी सुनेनं माहेरी जाण्याचा हट्ट केला. स्मृती आमची सून नाही ही आमची मुलगी आहे असं मी स्मृतीच्या वडिलांना सांगून हमी दिली, इतकंच नव्हे, तर तिला हवं असल्यास आम्ही स्वत: तिचं दुसरं लग्न लावून देऊ आणि मुलगी म्हणून तिला तिच्या भावी सासरी पाठवू.' असं राम प्रताप सिंह म्हणाले. 

हेसुद्धा वाचा : पहिल्या नजरेत प्रेम, 8 वर्ष लाँग डिस्टन्स रिलेशनशिप; फेब्रुवारीत लग्न अन् जूनमध्ये...शहीद कॅप्टनच्या पत्नीचा Video पाहून गहिवरून जाल

 

सासऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्मृतीनं नोएडामध्ये लेकीसोबत राहत असतानाच तिच्याकडे अंशुमनच्या अनेक गोष्टी होत्या. पण, जेव्हा श्राद्धानंतर ती तिच्या आईवडिलांसमवेत नोएडाला परतली तेव्हा तिनं सर्व आठवणी आणि सामाना स्वत:सोबत नेल्याचं म्हणत आपली लेक जेव्हा नोएडातील घरी गेली तेव्हा तिथं अंशुमनचं सामान नसल्याचं तिच्या लक्षात आलं. 

किर्तीचक्र प्रदान केल्यानंतर... 

शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या मातोश्रींनी दिलेल्या माहितीनुसार. '5 जुलै रोजी राष्ट्रपतीभवनातील कार्यक्रमासाठी मी स्मृतीसोबत गेले होते. या कार्यक्रमातून बाहेर आल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यावरून फोटो काढण्यासाठी किर्तीचक्र माझ्या हाती आलं पण, त्यानंतर लगेचच स्मृतीनं ते परत घेतलं आणि त्यानंतर लेकाच्या बलिदानाचं प्रतिक असणाऱ्या त्या किर्तीचक्राला पुन्हा स्पर्श करता आला नाही.' 

मुलाच्या स्मरणार्थ आपण त्याचा पुतळा स्थापिक करून त्यासंबंधीची माहिती आम्ही मेसेज करून स्मृतीला दिली. य़ा पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी किर्तीचक्र घेऊन येण्याचा आग्रह करूनही समोरून मात्र काहीच उत्तर मिळालं नसल्याचं शहीद जवानाच्या वडिलांनी सांगितलं. मुलाच्या सिमकार्डपासून त्याच्या पत्त्यापर्यंत सर्वकाही सुनेनं बदललं असून. हा पत्ताच तो आमच्याशी जोडला गेल्याचा एक पुरावा होता आणि तिनं तोसुद्धा आम्हाला न सांगता बदलला. त्यामुळं आता  सरकारकडून कोणताही पत्रव्यवहारही झाला, तरीही तो स्मृतीच्याच पत्त्यावर होईल असं म्हणत शहीदाच्या वडिलांनी खंत व्यक्त केली.