मुंबई : विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कोणत्याही नागरिकाला आता एअर इंडियानं प्रवास करताना अर्ध्या दरात तिकीट मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियमही लागू केले जातील. भारतीय नागरिकत्व असलेल्या, भारतात राहणारे ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 60 वर्षे पूर्ण असेल त्यांच्यासाठी ही योजना आहे.
यासंदर्भातील सर्व माहिती एअर इंडियाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. इकॉनॉमी केबिनमध्ये निवडण्यात आलेल्या श्रेणीच्या तिकिटाच्या किंमतीपैकी 50 टक्के रक्कम द्यावी लागेल. भारतातील कोणत्याही विभागात प्रवास करता येईल. तसंच तिकिट जारी केल्यानंतर एक वर्षापर्यंत लागू असेल. प्रवासाच्या आधी सात दिवस तिकिट बूक केल्यास याचा लाभ घेता येईल.
कोरोना काळात विमान सेवा देणाऱ्या कंपन्या आर्थिक संकटात आल्या आहेत. एअर इंडिया कंपनीने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक उत्तम योजना आणली आहे. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचं विमानाने प्रवास करण्याचे स्वप्नही पूर्ण होईल.
वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकाला प्रवासात सूट मिळण्यासाठी फोटो आयडीची आवश्यकता असते. ज्यात त्याची जन्म तारीख लिहिलेली असावी. यासाठी मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र दाखवू शकतात. जर आपण बोर्डिंग गेटजवळ योग्य कागदपत्रे दाखवली नाही तर ही सूट मिळणार नाही.