मुंबई : लवकरच लग्नसराईचा काळ सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरांबाबत ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सध्या दागिने खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी दिसून येत आहे.
मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या किंमती कालपेक्षा कमी होऊन 50900 रुपये प्रति तोळेवर आली आहे. त्यामुळे सोने आपल्या सर्वोच्च दरांवरून अजूनही 4700 रुपये प्रति तोळे स्वस्त मिळत आहे.
चांदीच्या किंमती आज mcx वर कमी झालेल्या दिसून आल्या. चांदी 67 हजार प्रति किलोहून कमी झाली आहे. म्हणजेच चांदीदेखील आपल्या रेकॉर्ड स्थरावरून 6 हजार रुपये प्रति किलो स्वस्त मिळत आहे.
मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर कमी झाले असले तरी मुंबईत मात्र सोन्याच्या दरामध्ये फारशी घसरण झाली नसल्याचे दिसून आले. मुंबईतील सोन्याचे दर काल इतकेच म्हणजेच 51,980 रुपये प्रति तोळे इतकेच आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपल्यानंतर सोन्याचे भाव आणखी खाली येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याआधी कोरोना महामारीच्या काळात सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली होती. 2020 मध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 55,700 रुपयांपर्यंत गेले होते.