नवी दिल्ली : रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपने समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे उमेदवार घनश्याम सिंह लोधी यांनी सपा उमेदवार असीम रझा यांचा 42,048 मतांनी पराभव केलाय.
रामपूर ही जागा सपा नेते आझम खान यांचा बालेकिल्ला मानली जाते. येथे आझम खान यांनी त्यांचे समर्थक असीम रझा यांना तिकीट दिले होते. आझम खान यांनीच असीम खान यांच्या नावाची घोषणा केली होती.
सकाळपासून मतमोजणी केल्यानंतर असीम खान सुरुवातीला आघाडीवर होते. पण नंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पोटनिवडणुकीत असीम खान यांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात होती. पण आझम समर्थक असीम खान यांना पराभवाचा सामना करावा लागला.
लोधी यांनाही आझम खान यांच्या जवळचे मानले जाते. 2022 मध्येच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. घनश्याम सिंह लोधी हे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचेही जवळचे मानले जातात. 2004 मध्ये झालेल्या एमएलसी निवडणुकीत त्यांनी कल्याण सिंह यांच्या राष्ट्रीय क्रांती पक्ष आणि मुलायम सिंह यादव यांच्या सपा यांच्या युतीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
आझम यांच्या राजीनाम्यामुळे जागा रिक्त
2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान या जागेवरून खासदार म्हणून निवडून आले होते. नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आझम खान आमदार म्हणून निवडून आले. विधानसभेवर निवडून आल्यानंतर आझम खान यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.