एटीएम फ्रॉडपासून सावधान, 'काडी' लावून काढले जात आहेत पैसै

एटीएम मशीनमध्ये काडेपेटीतील काडी टाकून पैसै काढल्याची घटना समोर आली आहे.

Updated: Dec 13, 2018, 01:02 PM IST
एटीएम फ्रॉडपासून सावधान, 'काडी' लावून काढले जात आहेत पैसै title=

नवी दिल्ली : सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. हल्ली जागोजागी एटीएम पाहायला मिळतात. त्यामुळे आपण सोबत पैसे न बाळगता गरजेच्या वेळेस आवश्यक तेवढेच पैस एटीएममधून काढतो. सर्वकाही आधुनिक झाले आहे. चोरांनी देखील चोरीसाठी स्मार्टमार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे. आपण अनेकदा एटीएममधून पैसे काढतो. याच एटीएममध्ये काड्या करुन या चोरांच्या टोळ्या पैसे काढत आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना आपल्याला सावध रहावे लागेल. हल्ली सर्रासपणे ऑनलाईन फ्रॉडच्या घटना घडताहेत. एटीएम मशीनमध्ये काडेपेटीतील काडी टाकून पैसै काढल्याची घटना समोर आली आहे.

राजधानी दिल्लीतल्या राजोरी गार्डन परिसरात ही घटना घडली. राजोरी गार्डन भागातील एटीएममधून एक महिला पैसे काढत होती. पण तांत्रिक अडचणीमुळे तिच्या खात्यातून पैसे निघाले नाहीत. एटीएममधून बाहेर पडल्यावर आपल्या खात्यातून १० हजार रुपये काढले असल्याचा मेसेज तिच्या मोबाईलवर आला. हा मेसेज पाहून महिला चकीत झाली आणि तिने एटीएमकडे धाव घेतली. एटीएममधून पैसे काढताना जी व्यक्ती त्यांच्यामागे होती, ती व्यक्ती तिथून पळ काढताना दिसली. त्यावेळेस त्या महिलेने आरडाओरडा केला. जवळच असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला तिचा आवाज ऐकू आला. पोलिसाने त्या संशयिताचा पाठलाग करुन त्याला अटक केली. अटक केलेली व्यक्ती ही दिल्लीतील पश्चिम विहार भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते आहे. सखोल चौकशीनंतर सर्व प्रकरण उघडकीस आले आहे.

अशी केली जाते छेडछाड

आम्ही एटीएमच्या बटणांखाली काडेपेटीची काडी लावून ठेवतो. ज्यामुळे एटीएम कार्ड तर स्वाईप होतो, पण यामुळे कोणतेही व्यवहार होत नाही. आम्ही एटीएममध्ये लोकांच्या पाठीमागे उभे राहून त्यांचा पासवर्ड जाणून घेतो. तोच पासवर्ड वापरुन आम्ही त्यांच्या खात्यातून एटीएमद्वारे पैसे काढून घेतो, अशी माहिती आरोपींने चौकशीनंतर पोलिसांना दिली. पोलिस आता या प्रकरणात हात असलेल्या इतर संशयितांचा शोध घेत आहे.

सावध राहा

एटीएममध्ये छेडछाड करुन पैसे लंपास करण्याच्या घटना राजरोसपण घडत आहेत. आपल्यासोबत अशी घटना घडू नये म्हणून आपल्याला सावध रहायला हवे. बँकेकडून आणि सरकारकडून ग्राहकांना बँकिंग फ्रॉडबद्दल जागृत करुन माहिती दिली जाते. तसेच एटीएममध्ये व्यवहार करताना काय काळजी घ्यावी, यासंदर्भात पोस्टर लावलेले असतात. त्यामुळे आपल्या सोबत अशा घटना होऊ नये यासाठी जागृत राहायला हवे.

एटीएम वापरताना काय काळजी घ्याल

एटीएममधून पैसे काढताना एका वेळेस एकच व्यक्ती आत आहे, याची खात्री करावी. दोन व्यक्ती असल्यास त्यांना बाहेर जाण्यास सांगावे. पैसे काढण्याची एखाद्याला घाई असेल, तर अश्यावेळी त्या व्यक्तीला प्राधान्य द्यावे. तुम्हाला जर एटीएम हाताळण्यास अडचण असल्याल, उपस्थित सुरक्षारक्षकाची मदत घ्यावी. आपला पासवर्ड कोणालाही सांगू नये. पैसे काढण्यास अडचण येत असल्यास, उपस्थित सुरक्षारक्षकाला सांगावे. अज्ञात व्यक्तीची मदत घेऊ नका.

अनेकदा एटीएममधून पैसे काढताना अडचणी येतात. काहीवेळा व्यवहार होऊन देखील पैसे येत नाहीत. अशावेळी गोंधळून न जाता, एटीएमवरील कॅन्सल बटन दाबून व्यवहार रद्द झाल्यानंतरच एटीएममधून बाहेर पडावे.एटीएम कार्ड स्वाईप केल्यानंतर पासवर्ड टाकताना, कोणी पाहत तर नाही ना, याची खबरदारी घ्यावी.