Bengal Election 2021 : भाजपच्या जागा वाढत असल्याने ममता दीदींपुढचं आव्हान वाढलं

विविध ओपिनियम पोलमध्ये भाजपच्या जागा वाढत असल्याचं दिसून येत आहे.

शैलेश मुसळे | Updated: Mar 25, 2021, 09:25 PM IST
Bengal Election 2021 : भाजपच्या जागा वाढत असल्याने ममता दीदींपुढचं आव्हान वाढलं title=

बंगाल निवडणूक 2021 : केरळसह आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. पण बंगालमधील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भाजपने आपली सर्व शक्ती बंगालमध्ये पणाला लावली आहे. यामुळे बंगालची निवडणूक रंजक आणि कांटे की टक्कर होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परेड मैदानावर निवडणूक रॅलीनंतर बंगालमधील निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. भाजपने बंगालमध्ये केंद्रीय नेत्यांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत ममताविरूद्ध अनेक बलाढ्य नेते मैदानात उतरवले आहेत.

तृणमूल, काँग्रेस, डाव्या आणि आयएसएफ युतीसह भाजपनेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पण सर्वात मनोरंजक सामना नंदीग्राममध्ये होणार आहे. नंदीग्राममधून तृणमूल काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये रुजू झालेल्या सुवेन्दु अधिकारी यांना तिकीट देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ममतांनी आपली पारंपारिक जागा भवानीपूर सोडली आहे आणि नंदीग्राम येथून निवडणूक लढवणार आहेत. अशा परिस्थितीत राजकीय विश्लेषक आणि माध्यमांचे डोळे नंदीग्राम मतदारसंघावर असणार आहे. नंदीग्रामनेच ममता बॅनर्जी यांना बंगालच्या सर्वात मोठ्या खुर्चीवर आणले. पण यामध्ये सुवेन्दु अधिकारी यांचा मोठा वाटा आहे.

बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, पक्षाला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास आहे. भाजपने त्यांच्याबद्दल काय विचार केला, ते त्यांचे रणनीतिकार ठरवतील. परंतु पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर ते दिसत आहेत. पक्षाने यातून सूचित केले आहे की त्यांच्यात त्यांना ट्रम्प कार्ड दिसत आहे. बंगालचे राजकारण आणि समाज या दोन्ही गोष्टींवर चित्रपट आणि साहित्याचा प्रभाव आहे.

पश्चिम बंगालमध्ये स्पर्धा त्रिकोणी असल्याचे दिसून येत आहे. तृणमूल, भाजप आणि डावे-काँग्रेस युती असा हा सामना होणार आहे. बंगालमध्ये पहिल्यांदा डावे आणि काँग्रेस एकत्र आले असे नाही. यापूर्वी 2016 च्या विधानसभा निवडणुकादेखील दोन्ही पक्षांनी एकत्र लढल्या होत्या. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते वेगळे झाले. आता 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकत्र येत आहेत.

ममतांना एंटी-इन्कंबेंसी वेव्हचा सामना करावा लागत आहे यात शंका नाही. जर त्यांच्याशी युती केली असती तर कदाचित काँग्रेस व डाव्यांचे राजकीय अस्तित्व संपले असते. यामुळेच दोन्ही पक्षांनी तृणमूलला आव्हान देण्यासाठी एकत्र येण्याचे ठरवले. डावे-काँग्रेस युतीसमोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे भाजप.

सध्या युती दोन्ही बाजूंकडून समान अंतर राखण्याच्या रणनीतीवर काम करीत आहे. पण या रणनीतीमुळे तृणमूलचे नुकसान होईल की भाजपचे हे आताच सांगणं कठीण आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपचा हिंदू मतांवर भर आहे आणि काँग्रेसचाही. तृणमूलचा मुस्लीम मतांवर अधिक डोळा आहे. तर डाव्यांकडेही मुस्लीम मतदार आहेत.

या आघाड्या अन्य पक्षाची मते कमी करतील की त्यांचे अस्तित्व वाचविण्यात सक्षम असतील? हा एक मोठा प्रश्न आहे. बंगालमध्ये भाजपच्या वाढीमुळे ही स्पर्धा आणखी रंजक झाली आहे.