कर्नाटक निवडणुकीआधी काँग्रेसची सभा उधळून लावली

Karnataka Elections 2023 : कर्नाटक निवडणुकीआधी राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. काँग्रेसची बेळगावातली सभा उधळून लावण्यात आली आहे. काँग्रेस उमेदवारासाठी देसूरमध्ये ही सभा आयोजीत करण्यात आली होती. 

सुरेंद्र गांगण | Updated: May 6, 2023, 03:11 PM IST
कर्नाटक निवडणुकीआधी काँग्रेसची सभा उधळून लावली title=

Karnataka Elections 2023 : कर्नाटक निवडणुकीआधी बेळगावमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची बेळगावातली सभा उधळून लावण्यात आली आहे. काँग्रेस उमेदवारासाठी देसूरमध्ये ही सभा आयोजीत करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्याने प्रचंड घोषणाबाजी करत सभा उधळून लावली. तेव्हा सभा न घेताच प्रणिती शिंदे माघारी परतल्या. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तरीही महाराष्ट्रातले राजकीय नेते त्यांच्याविरोधातल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जात असल्यानं एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. 

संजय राऊत यांनी केला महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचार केला. ही समिती म्हणजे येथील शिवसेना आहे, असे उद्गार काढले.  कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, दक्षिण उमेदवार रमाकांत कोंडुसकर, म. ए. समिती सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गर्दीत कोपरा सभा झाली. यावेळी राऊत यांनी भाजपवर तोफ डागत येथील लोकप्रतिनिधींचे हिंदुत्व ढोंगी असल्याची टीका केली. मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करु पाहणाऱ्या आमदारांनी आजवर निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. शेतकऱ्यांची शेती हिरावून घेणे, दडपशाहीने जमिनी बळकावणे, हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणाऱ्या आमदारांनी मंदिरे देखील सोडली नाहीत. भाजप मराठी बांधवांविरोधात प्रचार करत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. दरम्यान, भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रचार केला. 

भाजपला मोठा फटका बसणार, काँग्रेला फायदा

निवडणुकीपूर्वी, तीन ओपिनियन पोल अर्थात निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनी काँग्रेसला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे, तर झी न्यूज-मॅट्रिझच्या एका ओपिनियन पोलने भाजपला विजय मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. एबीपी-सीव्होटर ओपिनियन पोलने भाकीत केले आहे की कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे, तर भाजपला मोठा फटका बसू शकतो आणि जनता दल बरोबरीची कामगिरी करु शकते. कर्नाटकातील विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेस 107 ते 119 जागा जिंकू शकते, तर भाजपला 74 ते 86 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि जेडी(एस) 23 ते 35 जागा मिळवू शकेल.

इंडिया टुडे-सीव्होटरच्या दुसर्‍या ओपिनियन पोलने कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत "भाजपचा पराभव होण्याची शक्यता आहे" असा अंदाज वर्तवला आहे. सध्याच्या सत्ताधारी पक्ष भाजपला 2018 च्या निवडणुकीपेक्षा 24 कमी, फक्त 74-86 जागा मिळतील, असेही या सर्वेक्षणाने म्हटले आहे.