कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री ठरले, भाजपने दाखवला 'या' नेत्यावर विश्वास

येडियुरप्पा पायउतार झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता होती

Updated: Jul 27, 2021, 08:35 PM IST
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री ठरले, भाजपने दाखवला 'या' नेत्यावर विश्वास title=

कर्नाटक : कर्नाटक राज्याला अखेर नवे मुख्यमंत्री भेटले आहेत. बंगुळुरुत भाजप विधीमंडळ बैठकीत बसवराज बोम्मई यांच्या नावावर नवे मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं. बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतर बसवराज बोम्मई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आहे. ते कर्नाटकचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. 

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत आज संध्याकाळपर्यंत उत्सुकता होती. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. बैठकीत बसवराज बोम्मई यांच्या नावावर एकमताने सहमती दर्शवण्यात आली. त्याआधी बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, किशन रेड्डी आणि अरुण सिंह यांची भेट घेतली. 

बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर विधानसभेत बोलताना येडियुरप्पा म्हणाले होते की, मला माझ्या कारकिर्दीमध्ये नेहमीच अग्निपरिक्षा द्यावी लागली आहे. 'एकापाठोपाठ एक मी अग्निपरिक्षेचा सामना केलाय, तरी सुद्धा मी माझे काम करत राहिलो. सरकारी कर्मचारी, मुख्य सचिव यांचे आभार कसे मानू, ते मला समजत नाहीय. त्यांनी खूप मेहनत केली. माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांच्यामुळेच कर्नाटकाचा विकास करता आला' असे येडियुरप्पा म्हणाले होते.