सिगरेटची तलब पडली महाग, महागडी घड्याळं भरलेला ट्रक चोरट्यांनी केला लंपास... किंमत ऐकून बसेल धक्का

महागडी घड्याळं भरलेला ट्रक सोडून ड्रायव्हर सिगरेट पिण्यासाठी टपरीवर गेला, पण ही सवय त्याला चांगलीच महागात पडली

Updated: Jan 31, 2023, 08:41 PM IST
सिगरेटची तलब पडली महाग, महागडी घड्याळं भरलेला ट्रक चोरट्यांनी केला लंपास... किंमत ऐकून बसेल धक्का title=

Crime News : सिगरेट पिण्याची तबल एका ट्रक चालकाला चांगलीच महागात पडल्याची घटना समोर आली आहे. महागड्या घड्याळ्यांचे बॉक्स असलेल्या ट्रकचा चालक आणि क्लिनर सिगरेट पिण्यासाठी टपरीवर गेला आणि टायटन कंपनीच्या महागड्या घड्याळ्यांनी भरलेल्या ट्रकमधील सामान चोरट्यांनी लंपास केलं. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आलं आहे. चोरीला गेलेल्या घड्याळ्यांची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगळुरुमधल्या जावरेगौडानगर इथली ही घटना आहे.

 या परिसरात जयदीप एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे.  15 जानेवारीला दुपारी जयदीप एंटरप्राइजेसमधल्या गोदामातून संध्याकाळी उशीरा टायटन घड्याळ्यांचे बॉक्स ट्रकमध्ये लोड करण्यात आले. या बॉक्समध्ये जवळपास 1282 घड्याळं होती.  रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ट्रकच्या चालक आणि क्लिनरला सिगरेट पिण्याची तलब आली. यासाठी ते जवळच्या टपरीवर गेले. दरम्यान पाच ते सहा लोकांच्या टोळीने हीच संधी साधली. त्याचवेळी चालक आणि क्लिनर परतले. पण त्या टोळीने त्यांच्यावर  हल्ला केला आणि त्यांना बेदम मारहाण केली. 

त्यानंतर चोरट्यांनी ट्रकमधले टायटन घड्याळ्याचे बॉक्स लंपास केले. चोरी झालेल्या घड्याळ्यांची किंमत जवळपास 57 लाख रुपये इतकी आहे. महागडी घड्याळं चोरीला गेल्याचं कळल्यानंतर जयदीप एंटरप्राइजेसच्या मॅनेजरने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला.

परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी त्या फूटेजच्या आधारे दोन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं जमीर अहमद आणि सैयद शाहिद असं आहे. इतर चार आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असून घड्याळ्यांचे 23 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.