Social Media Ban: सध्याच्या जमान्यात सोशल मीडियामुळे अनेकांचा वेळ वाया जातोय. विशेषत: लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतोय. सोशल मीडियात गुंतलेली मुले मैदानी खेळ खेळायला विसरली आहेत. वेळ अशी आलीय की सोशल मीडिया वापरु नको सांगितलं की मुलांना राग येतो. रागाच्या भरात मुले काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे मुलांना सोशल मीडिया वापरण्यावरुन रोखणं हे पालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ही अडचण आहे. पण असाही एक देश आहे, ज्याने मुलांच्या भवितव्याचा विचार करुन कठोर निर्णय घेतलाय.
मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात देशभरात पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. "सोशल मीडिया आमच्या मुलांचे नुकसान करतंय आणि आम्हाला ते थांबवायचंय, असे अल्बानीज यांनी सांगितले.
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला धोके निर्माण होतात. सोशल मीडियात मानवी शरीराचे नको त्या पद्धतीचे चित्रण केले जाते, महिलाविरोधी कंटेट, मुलींना धोका निर्माण होईल असा कंटेटही मोठ्या प्रमाणात असतो, असे ते म्हणाले. 14 वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल होत असतात. या वयात मुलं परिपक्व होत असतं. अशा वयात जर तुम्हाला सोशल मीडियाद्वारे नको तो कंटेंट मिळाला तर ते खूप कठीण ठरु शकते, असेही ते म्हणाले.
लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावरील बंदीचे विधेयक यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत सादर केले जाणार आहे. यातील कायद्यांवर खासदारांची मंजुरी घेतली जाईल. यानंतर पुढे 12 महिन्यात हे विधेयक लागू केले जाऊ शकते. या विधेयकाला विरोधी लिबरल पक्षानेही समर्थन जाहीर केले आहे. त्यामुळे याला कोणाचा फारसा विरोध नसेल हे स्पष्ट झाले आहे. आता ज्या आई-वडिलांची संमती आहे किंवा ज्या मुलांकडे आधीच सोशल मीडिया अकाऊंट आहे, त्यांना यात कोणती सवलक मिळणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
"14 वर्षाआतील मुलांच्या सोशल मीडियाचा ॲक्सेस नियंत्रित करण्याची जबाबदारी पालक किंवा मुलांची नसून संबंधित प्लॅटफॉर्मची असेल, असे अल्बानीज म्हणाले. मेटाचे इंस्टाग्राम आणि फेसबुक तसेच बाइटडान्सचे टिकटॉक आणि एलोन मस्कचे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा यामध्ये समावेश असेल. अल्फाबेटचे यूट्यूबही कायद्याच्या कक्षेत येऊ शकते, असे यावेळी कम्युनिकेशन मंत्री मिशेल रोलँड म्हणाले.
याआधी अनेक देशांनी कायद्या आणून अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडियाचा वापर रोखण्याची शपथ घेतली आहे. असे असले तरी या सर्वामध्ये ऑस्ट्रेलियाचे धोरण सर्वात कठोर आहे. गेल्यावर्षी फ्रान्सने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला होता. पण पालकांच्या संमतीनंतर मुलांना सोशल मीडिया वापराची परवानगी देण्यात आली.
13 वर्षांखालील कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे,यासाठी अमेरिकेने तंत्रज्ञान कंपन्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकेत कमी वयाच्या मुलांसाठी बहुतांश सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यावर निर्बंध आहेत.