मुंबई : बलिप्रतिपदा निमित्तानं राज्यभरातील हजारो बळीराजांनी पंतप्रधानांना पत्र पाठवलं. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत यावेळी जोरदार आंदोलन करण्यात आलं. किसान सभेच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या आंदोलनात राज्यातील २१ जिल्ह्यांमधून हजारो पत्रं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली. केंद्र सरकारने राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसान मदतीत भरीव वाढ करावी.
पीक विमा योजनेची रास्त अंमलबजावणी करावी. पीक विमा योजना शेतकऱ्यांना न्याय देणारी बनवण्यासाठी पावलं उचलावीत. शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना आधार भावाचं कायदेशीर संरक्षण द्यावे.
या आणि इतरही मागण्या यावेळी करण्यात आल्या. तालुका आणि गाव स्तरावर शेतकऱ्यांनी लिहिलेली पत्रं पोस्टाच्या पेटीत टाकण्यासाठी किसान सभेतर्फे मिरवणुका काढण्यात आल्या. केंद्र सरकारनं आपली शेतकरीविरोधी धोरणं तातडीनं मागं घ्यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.