नवी दिल्ली : दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित रुग्णालयानं मागच्या आठवड्यात चुकून मृत घोषित केलेल्या चिमुरड्याचा अखेर मृत्यू झालाय.
३० नोव्हेंबर रोजी या चिमुरड्याचा दिल्लीतील शालीमार बाग भागातील मॅक्स रुग्णालयात जन्म झाला होता. या चिमुरड्याच्या आईनं
एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन जुळ्यांना जन्म दिला होता... ही दोन्हीही मुलं मृत जन्माला आल्याचं सांगत रुग्णालयानं एका प्लास्टिकच्या पिशवीत दोन्ही अर्भकांना भरून त्यांच्या पालकांच्या हाती सोपवलं होतं. परंतु, पिशवीत एका बालकाची हालचाल जाणवल्यानंतर आई-वडिलांना आपला मुलगा जिवंत असल्याचं समजलं होतं.
या बाळाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, मंगळवारी सायंकाळी या बाळानं अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती पोलीस आयुक्त असलाम खान यांनी दिलीय.
जिवंत बाळाला मृत घोषित करणाऱ्या रुग्णालयावर बालकाच्या पालकांनी खटला दाखल केलाय. रुग्णालयानं महिलेची प्रसुती करणाऱ्या दोन डॉक्टरांना यापूर्वीच निलंबित केल्याचं सांगितलंय. या प्रकरणात रुग्णालयाची चूक उघडकीस आल्यास रुग्णालयाचं लायसन्सही रद्द होऊ शकतं.