राजकारणापलीकडील कलारसिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ आणि घटनेचे शिल्पकार म्हणून कणखर आणि खंबीर अशी ओळख असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तितकेच हळव्या मनाचे होते. हे त्यांच्यातला असलेला कलाकार कायमचं दाखवून देत असतं. वाचनाने माणूस विवेकी होतो तसाच त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांनी तो समृद्ध होतो. कुशल व्यक्तिमत्त्व आणि भावनाशिल कलाकार या बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही छटा हृदयात घर करुन जातात. 

Updated: Apr 14, 2024, 01:39 PM IST
राजकारणापलीकडील कलारसिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर title=

तृप्ती गायकवाड,झी मीडिया, मुंबई : 'शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही'. शिक्षण, राजकारण, पत्रकारिता यांसारख्या अनेक क्षेत्रांत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं मोलाचं योगदान आहे. कथा, कादंबऱ्या, नाटक आणि सिनेमा अशा विविध माध्यमातून बाबासाहेबांचा खडतर जीवनप्रवास समाजापुढे मांडण्यात आला. माणसाला 'माणूस' म्हणून वागवण्यात यावं याकरिता बाबासाहेबांनी पिढ्यानपिढ्या लादून दिलेली बंधन झुगारून देत समाजाविरुद्ध बंड पुकारलं. बाबासाहेबांच्या समाज सुधारण्यासाठी निवडलेल्या मार्गात अनेक खाचखळगे होते. दलितांच्या हक्कासाठी आणि समाजसुरधारणेसाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतल्याची इतिहास कायमच साक्ष देत आला आहे. मात्र यापलिकडे जाऊन बाबासाहेबांना कलासक्त आयुष्य जगण्याची रुची होती.

राजकीय विश्लेषक आणि कायदेपंडित बाबासाहेबांची बाजू संपूर्ण जग जाणतं, मात्र राजकारणापलीकडे बाबासाहेब हे कलारसिक होते. नाट्य, गायन आणि वादन याची त्यांना रुची होती. बाबासाहेबांच्या घरातच कलेचा वास होता. त्यांचे  मोठे बंधू आनंदराव उत्कृष्ट तबला वादन करत असे, त्यामुळेच बाबासाहेबांना लहानपणी भजन-कीर्तनात तबला वादनाची आवड निर्माण झाली. क्रिकेट आणि चित्रकलेचीही त्यांना विशेष आवड आणि उत्तम जाण होती. रोजच्या धकाधकीच्या कामकाजातून पुरेसा वेळ मिळाल्यावर ते व्होयलेन आणि सारंगी वाजवत. 1937 मध्ये बाबासाहेबांनी  व्होयलेन शिकण्यास सुरुवात केली. दादरमधील वैद्य सर संगीतातले जाणकार होते, त्यांनी बाबासाहेबांना व्होयलेन वाजवण्यास शिकवले. 

फाटकं लुगडं... शाहू महाराजांनी दिलेला शेला; बाबासाहेबांच्या कार्यासमोर दुर्लक्षित राहिलेल्या रमाईंचा 'तो' किस्सा

बाबासाहेबांचे हे संगीत प्रेम लक्षात घेत सिद्धार्थ महाविद्यालयातील रेगे सरांनी बाबासाहेबांची ओळख बळवंत साठे सरांशी करून दिली. साठे सर बाबासाहेबांना सारंगी वादन शिकवत असे. कणखर आणि बंडखोर वृत्तीचं हे व्यक्तिमत्त्व सरंगीचे सूर छेडताना मात्र हळवे होत. कला माणसातलं माणूसपण टिकवते. हे कलेच्या सहवासातून बाबासाहेब जगत होते. संगीतासोबतच बाबासाहेबांना नाटक आणि सिनेमाची उत्तम जाण होती. जेष्ठ साहित्यिक प्रबोधनकार ठाकरे यांच्या 'खरा ब्राम्हण' या नाटकाचं बाबासाहेबांनी समीक्षण केलं होतं. 'श्यामची आई' या सिनेमाच्या दिग्दर्शनाबद्दल त्यांनी अत्रेंचं कौतुक करत अभिनंदन केलं होतं. जागतिक पातळीवर नाट्यविश्वात शेक्सपिअरची नाटकं अजरामर आहेत. जे उत्तम आहे ते मराठी यावं या हेतूने त्यांनी शेक्सपिअरच्या 'किंग लियर' या कलाकृतीवरून मराठीत 'शहाणी मुलगी' या नावाने प्रहसन लिहिले होते. राजकारण आणि समाजाच्या हितासाठी बाबासाहेब त्यांचं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं पण एकांतात असताना आणि  त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना त्यांच्यातल्या कलाकाराने जगण्याचं बळ दिलं.

...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये साजरी केली जाते