Ayodhya Ram Mandir: रामलल्लाच्या स्वागतासाठी संपूर्ण भारतीय उत्सुक आहेत. नववधूप्रमाणे अयोध्यानगरी सजली आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात श्रीरामाची गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या लोकार्पणाच्या सोहळ्याची परदेशातही दखल घेतली जात आहे. जस जसा लोकार्पणाचा दिवस जवळ येतोय तशी उत्सुकता अधिक वाढत चालली आहे. मात्र, त्याचबरोबर अनेक फसवणुकीचे प्रकारही समोर येत आहे. अनेक भाविकांना व्हॉट्सअॅपवर फ्रॉड मेसेज येत आहेत. 22 जानेवारी रोजी अयोध्या मंदिरात व्हीआयपी प्रवेश देणारे मेसेजही व्हायरल होत आहेत.
व्हीआयपी प्रवेश देण्याच्या आमिषाने हे मेसेज करण्यात येत आहे. या मेसेजमध्ये एक APK (अँड्रोइड अॅप्लिकेशन पॅकेज) फाइल आहे. ही फाइल राम जन्मभूमी गृहसंपर्क अभियान या नावाने पाठवली जाके. त्यानंतर, दुसऱ्या मेसेजमध्ये व्हिआयपी अॅक्सेससाठी एक अॅप इंन्टॉल करण्यासाठी सांगितले जाते. पण हा एक स्कॅम असून ज्या भाविकांना अयोध्येत राम मंदिराच्या दर्शनासाठी जायचे आहे, त्यांना लक्ष्य केले जात आहे.
या मेसेजवरील लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या स्मार्टफोनमध्ये खतरनाक फाइल्स, मॅलवेअर किंवा अॅप इंजेक्ट करण्यात येतात. सायबर चोर तुमच्या फोनमधील पर्सनल डेटा चोरु शकतात. इतकंच, काय तर तुमच्या पैशांनाही धोका पोहोचू शकतो. ज्यामुळं तुमचे बँक डिटेल्सही अडचणीत येऊ शकतात.
काही वेबसाइट्सवर राम मंदिराचा प्रसाद घराघरात पोहोचवण्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासाठी रामभक्तांना वेबसाइटवर ऑर्डर करण्यास सांगितले जाते. तसंच, ज्या भाविकांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहता येत नाहीये. ते या वेबसाइटवरुन प्रसाद ऑर्डर करु शकतात, असा फ्रॉड मेसेज करण्यात येत आहे. मात्र, राम मंदिराचा प्रसाद घरी डिलिव्हर करणाऱ्या या कंपन्या बनावट असून लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. या कंपन्यांच्या वेबसाइट या राम मंदिर ट्रस्ट किंवा सरकारच्या नाहीयेत.
राम मंदिराचा प्रसाद घरी पोहोचवण्याचा दावा करणाऱ्या या वेबसाइट प्रसादासाठी 50 व 100 रुपये घेत आहेत. अशातच अनेक रामभक्तांनी यावर विश्वास ठेवून बुकिंगदेखील केली आहे. या वेबसाइट्सनी 22 जानेवारी रोजीच प्रसाद घरी डिलिव्हर करण्याचा दावा केला आहे. विश्व हिंदू परिषदेनही या वेबसाइट बनावट असल्याचे म्हटलं आहे. प्रसाद वितरणासाठी मंदिर ट्रस्टने कोणालाही कंत्राट दिलेले नाहीये.