Record Deal: IndiGo कंपनीची मोठी झेप, विमान वाहतूक क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार

IndiGo Big Deal: भारतीय विमान क्षेत्रात इंडिगो विमान कंपनीने मोठी झेप घेतली आहे. कोणत्याही विमान कंपनीकडून एकाचवेळी सर्वाधिक विमानांची खरेदी करण्याचा विक्रम इंडिगो विमान कंपनीने केला आहे.

राजीव कासले | Updated: Jun 19, 2023, 09:35 PM IST
Record Deal: IndiGo कंपनीची मोठी झेप, विमान वाहतूक क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार title=

IndiGo Big Deal: कोरोना काळानंतर भारतीय विमान कंपन्यांना (Aviation Sector) घरघर लागली होती. अनेक विमान कंपन्यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अशात IndiGo विमान कंपनीने मात्र मोठी झेप घेतली आहे. इंडिगो कंपनीने विमान क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार केला आहे. इंडिगो आणि एअरबसदरम्यान (Airbus) हा करार झाला असून इंडिगोने तब्बल 500 एअरबस A320 विमान खरेदीची घोषणा केली आहे. भारतीय विमान कंपनीकडून इतक्या विमान खरेदीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार ठरला आहे. 

इंडिगो विमान कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. विमानांचं वितरण 2030 ते 2035 दरम्यान होण्याची शक्यता आहे. या करारासाठी इंडिगो व्यवस्थापनाने तब्बल 50 अरब डॉलर्सच्या निधीला मान्यता दिली आहे. सध्य परिस्थितीत इंडिगो विमान कंपनीकडे 300 विमानं आहेत. आता इंडिगोने आणखी 500 विमानांची ऑर्डर दिली आहे. एअरबस कंपनीबरोबर एकाचवेळी इतक्या विमान खरेदीची ही पहिलीच वेळ आहे. 500 विमानांमध्ये ए320 आणि ए321विमानाचा समावेश आहे. 

इंडिगोबरोबरच्या करारानंतर एअरबसकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. भारतातील सर्वात मोठ्या एअरलाइन इंडिगोने 500 A320 फॅमिली एअरक्राफ्ट खरेदीसाठी मोठी ऑर्डर दिली आहे. व्यावसायिक विमान वाहतुकीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा खरेदी करार आहे. इंडिगोने ऑर्डर केलेल्या एकूण एअरबस विमानांची संख्या 1,330 झाली आहे.

देशांतर्गत विमान वाहतूक सेवा
इंडिगो ही भारतीय विमान वाहतूक बाजारपेठेतील  मोठी कंपनी आहे. एप्रिल 2023 च्या एअरलाइन्सच्या आकडेवारीनुसार भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील देशांतर्गत बाजारपेठेत इंडिगोचा हिस्सा 57 टक्क्यांहून अधिक आहे. irbus चे चीफ कमर्शियल ऑफिसर आणि इंटरनॅशनल हेड ख्रिश्चन शियर यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून एअरबस आणि इंडिगो यांच्यातील करार हा विमानकंपनी क्षेत्रातील नवा अध्याय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये एअर इंडियाने (Air India) 470 विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी 250 विमाने एअरबसकडून आणि 220 विमाने बोईंगकडून खरेदी करण्यात येणार आहेत. एअर इंडियाची मालकी टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीत घेतली होती.

विमान वाहतूक क्षेत्र अडचणीत असताना इंडिगो आणि एअरबसमधील करार महत्त्वाचा मानला जात आहे. आर्थिक अडचणींमुळे गो फर्स्ट एअरलाइनने स्वतःला दिवाळखोर घोषित केलं आहे.  स्पाइसजेट विरुद्ध अनेक कंपन्यांनी दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे.