2023 Average Salary Hike: एकीकडे मागील काही आठवड्यांपासून सातत्याने जगभरातील आघाडीच्या कंपन्यांमधून कर्मचारी कपातीच्या बातम्या समोर येत आहेत. हजारोंच्या संख्येनं कमर्चाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं जात असतानाच भारतीय नोकरदारांसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे ही बातमी नोकरदारांच्या सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पगारवाढीबद्दल (salary hike) आहे. वर्ष 2023 मध्ये भारतीय कर्मचाऱ्यांना 2 आकडी पगारवाढ (salary increase) मिळण्याची शक्यता एका अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. कर्मचारीकपातीमध्ये ही वाढ समाधानकारक असली तरी मागील वर्षीच्या 10.4 टक्क्यांच्या तुलनेत ही वाढ कमी राहील असं सूचित करण्यात आलं आहे. म्हणजेच अगदी थोड्यात सांगायचं झाल्यास ही पगारवाढ सरासरी (Average salaries) 10 ते 10.4 टक्क्यांदरम्यान राहणार आहे.
भारतीयांना यंदाच्या वर्षी 10.2 टक्के पगारवाढ मिळेल (salaries expected to increase) अशी शक्यता 'फ्युचर ऑफ पे' (Future of pay report) नावाच्या सर्वेक्षणानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी तंत्रज्ञान क्षेत्राशीसंबंधित म्हणजेच आयटीशी संबंधित क्षेत्रांमध्ये विक्रमी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्समध्ये सर्वात जास्त म्हणजे 12.5 टक्के वाढ अपेक्षित असून त्या खालोखाल या क्षेत्रातील कॉर्परेट कर्मचाऱ्यांना 11.9 टक्क्यांपर्यंत पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कोअर आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 10.8 टक्के पगारवाढ मिळू शकते असा अंदाज व्यक्त केली जात आहे.
2021 मधील 14 टक्के पगारवाढीच्या तुलनेमध्ये 2022 मध्ये पगारवाढ 15.6 टक्के इतकी झाली होती. आर्थिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांनी सर्वात जास्त सरासरी पगारवाढ केली होती. या क्षेत्रातील पगारवाढ 25.5 टक्के इतकी होती. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील सरासरी पगारवाढ 13.7 टक्के इतकी होती. परफॉमन्स अप्रायझल म्हणजेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाच्या जोरावरच ही पगारवाढ देण्यात आली होती, असं अहवालात म्हटलं आहे.
ई-कॉमर्स, डिजिटल क्षेत्र, आरोग्य, टेलिकम्युनिकेशन, शिक्षण क्षेत्र, लॉजिस्टिक, वित्तीय तंत्रज्ञान यासारख्या सेक्टरमध्ये नोकऱ्यांच्या अधिक संधी उपलब्ध असतील 'फ्युचर ऑफ पे'च्या अहवालामध्ये म्हटलं आहे. एआय म्हणजेच आर्टिफिशिएल इंटेलिजन्स, एमएल आणि क्लाऊडसारख्या तांत्रिक क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची संधी अधिक असेल. याशिवाय चांगला पगार आणि मनुष्यबळाची मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर, डेटा आर्किटेक्चर या क्षेत्रांचा समावेश आहे.
सध्या जगभरामध्ये सध्या नोकरकपातीची लाट आली असून अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच 1.48 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे. यामध्ये फेसबुकची मातृक कंपनी मेटा, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.