गुवाहाटी: आसामममध्ये शनिवारी राष्ट्रीय नागरिकत्व प्रमाणपत्राची (एनआरसी) अखेरची यादी जाहीर करण्यात आली. एनआरसीच्या अखेरच्या यादीत ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ जणांची नावे आहेत. तर १९ लाख ६ हजार ६५७ जणांची नावे या यादीत नाहीत. ज्यांची नावं यादीत नाहीत ते परदेशी लवादाकडे अपिल करू शकतात.
सध्या ज्यांची नावे यादीत नाहीत त्यांच्या सर्व सरकारी सुविधा आणि लाभ रद्द करण्यात आले आहेत. ज्यांची नावे यादीत नाहीत त्यांच्याकडे आधार कार्ड किंवा मतदानपत्र नाही हे सिद्ध झाले आहे.
या यादीच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक भागात जमावबंदी लागू करण्यात आलीय. गेल्यावर्षी तयार करण्यात आलेल्या मसुदा यादीत केवळ २ कोटी ९० लाख नागरिकांचे नाव होते. तब्बल ४० लाख नागरिक आपले नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपत्र सादर करू शकली नव्हती. मसुदा यादीनंतर आता पुन्हा एकदा सरकारने या सर्वांना एक संधी दिली होती. ज्यांना या यादीत स्थान मिळणार नाही त्यांच्याकडून उद्रेक केला जाण्याची शक्यता आहे. ते रोखण्यासाठी राज्यात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सुरक्षेसाठी लष्कराच्या ५१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
आसाममध्ये एनआरसी मसुदा नव्याने तयार करण्याची मागणी १९८०च्या दशकात पुढे आली. बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात आसामध्ये येणाऱ्या घुसखोरांमुळे मूळच्या आसामी व्यक्तींची संख्या कमी होऊन मूळ आसामी संस्कृतीला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करत नागरिकांची नोंद नव्याने करण्याची मागणी होऊ लागली.