गुवाहाटी : हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) आसामचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना बरीच वाट पाहावी लागली. १० मे रोजी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. (Assam New Chief Minister)
आसाम (assam) मधील जोरहाट येथे जन्मलेल्या हिमंता बिस्वा सरमा हे वकील होते, परंतु राजकारणाची आवड अशी लागली की ते उद्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. हिमंता यांनी आपली राजकीय कारकीर्द काँग्रेसपासून सुरू केली. ते 2001 ते 2015 या कालावधीत काँग्रेसचे जालुकबारी विधानसभा मतदारसंघातून आमदार होते.
2014 मध्ये सोडली काँग्रेस
2014 मध्ये माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी राजकीय मतभेद झाल्याने 21 जुलै 2014 रोजी हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व विभागांचा राजीनामा दिला. एक वर्षानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. 2016 च्या विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. सोनोवाल सरकारमध्ये त्यांना वित्त, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, शिक्षण, नियोजन आणि विकास, पर्यटन, निवृत्तीवेतन आणि सार्वजनिक तक्रारी यासारख्या विभागांचे वाटप करण्यात आले.
भाजपला जिंकण्यात मोठी भूमिका
2016 च्या विधानसभा आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आसाम मध्ये भाजपला जिंकवण्यात हिमंताची मोठी भूमिका असल्याचे मानले जात. यासह, राज्यातील सीएएविरोधी आंदोलने आणि कोरोनाची परिस्थिती हाताळताना त्यांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले गेले. आसाम विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर लगेचच भाजपने हिमंता बिस्वा सर्मा यांना ईशान्य लोकशाही आघाडीचे अध्यक्ष केले. यानंतर, ईशान्येकडील अनेक राज्यात भाजपला सत्तेत आणण्यात त्यांनी मोठे योगदान दिले.
2001 मध्ये प्रथमच निवडणुका जिंकल्या
विद्यार्थी जीवनापासून हिमंता बिस्वा सरमा राजकारणात सक्रिय होते. ते 1991-92 मध्ये कॉटन कॉलेज गुवाहाटीचे सरचिटणीस झाले. गुवाहाटी उच्च न्यायालयात 5 वर्षे प्रॅक्टीस केली. मे 2001 मध्ये त्यांनी प्रथमच जालुकबारी सीटवरुन विजय मिळविला. या जागेवरुन हिमंता बिस्वा सरमा सलग पाचव्यांदा आमदार झाले आहेत. या वेळी त्यांनी 1 लाख 1,911 मतांच्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे.