मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानातील (Kuno National Park) आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यात या वनक्षेत्रात मृत्यू झालेला हा सातवा चित्ता आहे. 'तेजस' (Tejas) नावाचा हा चित्ता वनाधिकाऱ्यांना जखमी अवस्थेत आढळला होता. उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. तेजसच्या आधी तीन बछडे आणि तीन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वनाधिकाऱ्यांना चित्ता जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या मानेच्या वर जखमाच्या खुणा होत्या. त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र दुपारी 2 वाजता त्याचं निधन झालं. आपापसात झालेल्या संघर्षातून तेजसचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
वन विभागाने प्रसिद्धीपत्रकातून दिलेल्या माहितीनुसार, "11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता गस्ती पथकाला तेजस चित्ता जखमी अवस्थेत आढळला. यानंतर गस्त पथकाने तात्काळ पालपूर मुख्यालयात उपस्थित वन्यजीव पशुवैद्यकांना याची माहिती दिली. वन्यजीव पशुवैद्यकांनी घटनास्थळी जाऊन चित्त्याची तपासणी केली. प्राथमिक निरीक्षणात जखम गंभीर असल्याचं आढळून आलं होतं".
"उपचार देण्यासाठी परवानगी घेण्यात आली. यानंतर तेजसवर प्राथमिक उपचार करण्यासाठी आवश्यक तयारीसह पशुवैद्यकांचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलं. दुर्दैवाने, दुपारी 2 च्या सुमारास, तेजसचा मृत्यू झाला. तेजसला दुखापत होण्यामागील कारण शोधलं जात आहे. शवविच्छेदन तपासणीनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल," अशी माहिती वन विभागाने दिली आहे.
कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी दोन चित्ते जंगलात सोडल्याच्या काही तासांनंतर ही घटना घडली आहे. दोन चित्ते सोडण्यात आल्यानंतर आणि तेजसच्या मृत्यूनंतर येथील चित्त्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे.
सोमवारी प्रभाष आणि पावक हे दोन नर चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आल्याची माहिती श्योपूरचे विभागीय वन अधिकारी पी के वर्मा यांनी दिली होती. हे दोन चित्तेही दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणण्यात आले.
पाच माद्या आणि तीन नरांचा समावेश असलेल्या आठ नामिबियन चित्त्यांना KNP मध्ये आणण्यात आले आणि भारतात प्रजाती पुन्हा सादर करण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी विशेष बंदिस्तात सोडले.
या वर्षी 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतील आणखी बारा चित्ते पार्कमध्ये सोडण्यात आले. यामध्ये सात नर आणि पाच मादी होते. दरम्यान, चित्त्यांच्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत.