राजीव रंजन सिंह, झी मीडिया, मुंबई : मुंबई ते गोवा आपण गाडीनं, रेल्वेनं किंवा विमानानं नेहमीच जातो.. पण एखाद्या आलीशान क्रूझनं ही सफर करता आली तर? प्रेक्षकहो तुमचा हा प्रवास आता लवकरच पूर्ण होणार आहे.
आता मुंबई ते गोवा जलवाहतुकीचं तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ते ही आंतरराष्ट्रीय क्रूझ मधून... आंग्रिया नावाचं हे क्रूझ लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतंय. येत्या २४ ऑक्टोबरपासून हे क्रूझ प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
जपानमध्ये बनवलेल्या या क्रूझचं नाव कान्होजी आंग्रेंच्या नावावरुन आंग्रिया ठेवण्यात आलंय. या आलीशान १३२ मीटर लांब, १७ मीटर रुंदीच्या या क्रूझवर २ अल्पोपाहार गृहं, बार, तरण तलाव, छेटेखानी गोल्फ क्लब अशा सुविधा देण्यात आल्यात.
या क्रूझवर १०४ खोल्या आहेत ज्यात ३४० प्रवाशांच्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आलीय. प्रत्येक खोली खास जपानी शैलीत सजवण्यात आलीय. १५ ते १६ तासांच्या प्रवासात प्रवाशांना उत्तम जेवण, अल्पोपाहार आणि मनोरंजनाची मेजवानी मिळेल. यासाठी ५ हजारांपासून १२ हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतील. आंग्रिया सी इगल कंपनी आणि मुंबई पोर्ट यांनी ही क्रूझ सेवा सुरु केलीय.
आंग्रिया क्रूझची पहिली सफर २४ ऑक्टोबरला आहे. त्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टची जय्यत तयारी सुरु आहे. भविष्यात देशातील इतर शहरांनाही क्रूझ सेवेनं जोडण्याचा विचार आहे.
अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असलेली आंग्रिया पर्यावरण पूरकही आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात आलंय. एकाच वेळी १ हजार लोकांना क्षणात सुरक्षितपणे बाहेर काढण्याची क्षमता असलेली उपकरणं यावर बसवण्यात आलीत.
मुंबई गोवा सफर करताना प्रवाशांना या परिसरातील जलचरांची ओळख व्हावी यासाठी क्रूझवर मार्गदर्शक असेल.
पावसाळ्यात ही क्रूझ सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र हिवाळा आणि उन्हाळ्यात प्रवाशांना क्रूझने मुंबई-गोवा असा प्रवास करता येईल. http://angriyacruises.com/ या संकेतस्थळावरून यासाठी तुम्हाला बुकींग करता येईल.