अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी लिहिलेल्या पत्राबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. शाह यांनी पत्रात एकदम चुकीची माहिती दिली आहे. आपल्याला लिहिलेली माहिती अत्यंत खोटी असल्याचा पलटवार नायडू यांनी केलाय. अमित शाह यांचे पत्र हे खोट्या माहितीने भरलेले आहे.
भाजपकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. आंध्र प्रदेश सरकारबाबत खोटी माहिती पसरवण्यात येत आहे. अमित शाहांनी आपल्याला लिहिलेल्या पत्रातील माहिती खोटी असल्याचे नायडू यांनी म्हटलेय. अमित शाह यांनी त्यांच्या पत्रात आंध्रला केंद्राने अनेक वेळा निधी दिला असून आम्ही त्याचा उपयोग केला नाही असे म्हटले आहे. यावरुन आमचे सरकार आंध्रचा विकास करण्यात सक्षम नाही, असेच त्यांनी याद्वारे सुचवले आहे. मात्र, मी त्यांना सांगू इच्छितो की, आमच्या सरकारचा जीडीपी उत्तम असून कृषी क्षेत्रासह अनेक पुरस्कार आम्ही पटकावले आहेत. ही आमची क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही खोटं नाटं पसरवण्याचे काम का करीत आहात, असा पलटवार नायडूंनी केला.
दरम्यान, नायडू यांचा पक्ष अर्थात टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्यावर प्रतिक्रिया देताना अमित शाहा यांनी चंद्राबाबू नायडूंना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, टीडीपीचा एनडीएतून बाहेर पडण्याचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आणि एकतर्फी आहे. आंध्र प्रदेशच्या विकासाबाबत मोदी सरकार कटिबद्ध आहे. त्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही. यावरुन तुम्ही राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शाह यांनी केला. भाजप नेहमीच विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणारा पक्ष असून हीच आमची प्रेरणा असल्याचे शाह यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. याला नायडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेय.