नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून जम्मू आणि काश्मीरचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते काश्मीरमधील सद्यपरिस्थिती आणि तेथील फुटिरतावाद्यांची भूमिका यासंदर्भात माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. अर्थससंकल्प लक्षात घेऊन हा दौरा लवकर आयोजित करण्यात आलाय. दोन दिवसांच्या दौऱ्यात अमित शाह हे उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसेच काश्मीरमधील भाजपा नेते आणि पंचायत समिती सदस्यांनाही ते मार्गदर्शन करणार आहेत. तर, राज्यपाल सत्यपाल मलिक यांचीही भेट ते भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अमित शाहांचा हा पहिला काश्मीर दौरा आहे.
सुरक्षा बैठकीचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी अमित शाह २६ जूनपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वी ३० जून रोजी अमित शाह एक दिवसाचा खोऱ्याचा दौरा करणार होते. परंतु, संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याच्या कारणानं हा दौरा अगोदरच आखण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, या दरम्यान अमित शाह अमरनाथ गुफा मंदिरातही जाऊन पूजा-अर्चना करणार आहेत.
काश्मीरमधल्या इतरही राजकीय पक्षांचं लक्ष गृहमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे लागलंय. 'काश्मीरचा दौरा याआधीही अनेक गृहमंत्र्यांनी केलाय. शाह मोठ्या समर्थनासहीत सत्तेत आले आहेत त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत' असं राज्यातील पीडीपीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.