नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं नव्हतं, याचा संसदेत पुनरुच्चार केलाय. फारुख अब्दुल्ला यांना संसदेत यायचं नसेल तर त्यांच्या कानावर बंदूक ठेऊन बाहेर आणू शकत नाही. याअगोदर दोन दिवसांनंतर जनतेसमोर आलेल्या फारुख अब्दुल्ला यांनी गृहमंत्री संसदेत सपशेल खोटं बोलत असल्याचा आरोप केला. 'गृहमंत्री खोटं बोलतील याची अपेक्षा मला नव्हती. माझं राज्य जळत असताना आणि माझ्या माणसांना तुरुंगात टाकलं जात असताना मी माझ्या मर्जीनं घरात कसा राहू शकेन... हा तो भारत नाही ज्याच्यावर माझा विश्वास होता. जसे दरवाजे उघडतील तसे आम्ही बाहेर येईल... आम्ही न्यायालयात जाऊ... आम्ही बंदूक हातात घेतलेली नाही ना आम्ही ग्रेनेड फेकणारे आहोत... त्यांना आमची हत्या करायची आहे. माझा मुलगा तुरुंगात आहे' असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मात्र, यानंतरही अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना 'मी तिसऱ्यांदा हे सांगतोय की फारुख अब्दुल्ला आपल्या घरी आहेत. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं नाही ना त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांची तब्येत ठीक आहे... ते मौज-मस्तीत आहेत. त्यांना यायचं नसेल तर त्यांच्या कानावर बंदूक ठेऊन त्यांना बाहेर आणू शकत नाही' असं म्हटलंय.
'मै चौथ्यांदा हे सांगतोय आणि दहा वेळा सांगू शकतो की फारुख अब्दुल्ला यांना ना ताब्यात घेण्यात आलंय ना अटक करण्यात आलीय.. त्यांची तब्येत ठिक नसेल तर डॉक्टर त्यांना रुग्णालयात घेऊन जातील. सदनानं त्यांची चिंता करू नये. त्यांना बरं नसेल तर ते बाहेर आले नसते' असंही त्यांनी म्हटलं.
लोकसभेत दुपारच्या सत्रात अब्दुल्ला जनतेसमोर येण्याअगोदर काही वेळ अगोदर दोन दिवसांपासून कुठेही न दिसलेल्या फारुख अब्दुल्ला यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत प्रश्न विचारला होता. 'माझ्या बाजुला फारुख अब्दुल्ला संसदेत बसतात आणि ते जम्मू-काश्मीरमधून निवडून आलेत. पण आज मात्र त्यांचा आवाज कुठेही ऐकू येत नाहीय. त्यांच्याशिवाय ही चर्चा अपूर्ण आहे'. यावर उत्तर देतानाही गृहमंत्र्यांनी अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं नाही, असं म्हटलं होतं.