नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी बूथ कार्यकर्ता संमेलनात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. केजरीवालांनी दिल्लीसाठी काय केले हे सांगा ? असा प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला.
भाजपाला ही निवडणूक सभांमधून जिंकायची नाही. तर प्रत्येक घरी जावे लागणार आहे. मोहल्ला सभा करण्यासाठी लढावे लागणार आहे. या मोहल्ला सभेची सुरुवात मी करायला जात असल्याचे शाह म्हणाले.
केजरीवाल दैनिकांमध्ये आपल्या जाहीराती देऊन शुभेच्छा देत आहेत. असे तुम्ही कोणते काम पूर्ण केले ? हे सांगा. ५ वर्ष सरकार चालवल्यानंतर ते आता काम करण्यास सुरुवात करत असल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
२० कॉलेज बनवणार असे केजरीवालांनी सांगितले होते. ५ हजारहून जास्त शाळा बांधण्याबद्दलचे आश्वासन दिले होते. मी चष्मा लावून पाहतोय पण मला कुठे शाळा दिसत नसल्याचे शाह म्हणाले.
दिल्लीमध्ये १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे लागणार होते पण लागले नाहीत. शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्नही मार्गी लागला नाही. आम्ही जे देऊ इच्छित होतो त्यातही केजरीवाल हे आड येत आहे. दिल्लीच्या जनतेला याबद्दल आता कळाले असल्याचे ते म्हणाले.