वॉशिंग्टन : पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार कोटींचा गंडा घालून पळालेला नीरव मोदी अमेरिकेमध्ये असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या सगळ्याप्रकरणावर आता अमेरिकेनं प्रतिक्रिया दिली आहे. नीरव मोदी अमेरिकेत असलेल्या बातम्या आम्हीही पाहिल्या आहेत पण या बातम्यांना आम्ही दुजोरा देऊ शकत नाही, असं वक्तव्य अमेरिकेच्या परदेश विभागाच्या प्रवक्त्यांनी केलं आहे.
अमेरिका सरकार नीरव मोदीप्रकरणावरून भारताला मदत करत आहे का या प्रश्नावरही प्रवक्त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरं दिली. नीरव मोदीच्या चौकीशीसंदर्भात आणि कायदेशीर मदतीच्याबाबत तुम्ही विधी विभागाशी संपर्क करा, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या परदेश विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली. नीरव मोदी प्रकरणावर भाष्य करायला अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी नकार दिला.
देशात आर्थिक भ्रष्टाचार करून पळून जाणाऱ्यांना चाप लावण्याची पूर्ण तयारी केंद्र सरकारनं केलीय.
मंत्रिमंडळानं 'फरार आर्थिक गुन्हेगार विधेयका'ला मंजुरी दिलीय. या नव्या कायद्यामुळे आर्थिक घोटाळा करून देशाबाहेर पळून गेल्यास गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी गुन्हेगाराची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार सरकारला मिळणार आहे.
नीरव मोदीच्या अपहारानंतर सरकार सावध झालं असून तातडीनं हे पाऊल उचलण्यात आलंय. विजय माल्या, ललित मोदी आणि नुकताच पीएनबी घोटाळ्यामुळे चर्चेत आलेला नीरव मोदी अशी काही उदाहरणं देशानं पाहिलेली आहेत.