मुंबई : जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत मोठा बदल झालाय. एकीकडे भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे ते या यादीतून बाहेर झाले आहेत. वॉरेन बफे देखील श्रीमंतांच्या यादीत नवव्या स्थानावर घसरले आहेत.
आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि दीर्घकाळ जगातील अव्वल अब्जाधीशांपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांचा आता टॉप-10 श्रीमंतांमध्ये समावेश नाही. त्यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे आता रिलायन्सचे चेअरमन 11 व्या क्रमांकावर घसरले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अंबानींची एकूण संपत्ती आता 87.4 अब्ज डॉलरवर आली आहे. अब्जाधीश स्टीव्ह बाल्मर 88.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 10व्या स्थानावर पोहोचले आहेत.
टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेले दुसरे भारतीय उद्योगपती गौतम अदानी पाचव्या स्थानावर कायम आहेत. आपला दबदबा कायम ठेवत, अदानी यांनी सर्गे ब्रिन, जगातील दुसरे सर्वात श्रीमंत लॅरी पेज, लॅरी एलिसन यांना मागे टाकले असून, त्यांची एकूण संपत्ती $105 अब्ज आहे. ते आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
अंबानी आणि अदानी यांच्यात किती फरक
अब्जाधीशांच्या यादीतील या बदलामुळे दोन्ही भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर गौतम अदानी आता मुकेश अंबानींच्या खूप पुढे गेले आहेत. दोन्ही श्रीमंतांच्या संपत्तीत $17.6 बिलियनचे अंतर आहे. अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) अजूनही मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे.
टेस्लाचे सीईओ एलोन मस्क पहिल्या स्थानी
टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे $ 237.9 अब्ज संपत्तीसह जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यापाठोपाठ $149.3 अब्ज संपत्तीसह फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अरनॉल्ट, तर Amazon चे जेफ बेझोस $141.2 बिलियनसह तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स $ 124.6 अब्ज संपत्तीसह यादीत चौथ्या स्थानावर आहेत.
वॉरन बफे नवव्या क्रमांकावर
संपत्तीतील अस्थिरतेचा दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या निव्वळ संपत्तीवर मोठा परिणाम झाला आहे आणि ते टॉप-10 यादीत नवव्या स्थानावर घसरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती $97.7 अब्ज आहे. लॅरी पेज 102.6 अब्ज डॉलर्ससह सहाव्या स्थानावर आहे, तर लॅरी एलिसन 99 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सातव्या स्थानावर आहे. 98.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सेर्गे ब्रिन हे आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत आणि स्टीव्ह बाल्मर हे 88.1 अब्ज डॉलर्ससह दहाव्या क्रमांकावर आहेत.