नवी दिल्ली : ऑनलाईन उत्पादनं विकणारी ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने (Amazon) तरुणांना नोकरीसाठी कुशल बनवण्याचं काम हाती घेतलं आहे. अमेझॉन तरुणांना नोकरीसाठी तयार करण्यास आणि त्यांना नोकरी मिळवून देण्यास मदतही करणार आहे.
ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन इंडियाने (Amazon India) नुकताच एक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरु केला आहे. या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या (Skill Development Program) माध्यमातून कंपनी तरुणांसाठी नोकरीच्या नवीन संधी घेऊन येत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश, 1000 तरुणांना जोडणं आणि त्यांना सक्षम करणं हा असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत तरुणांना वेयरहाऊसिंग आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं ट्रेनिंग देण्यात येईल. याद्वारे तरुणांना वेयरहाऊस असोसिएट्स आणि प्रोसेस असोसिएट्सच्या कामासाठी सक्षम करण्यात येईल. हा प्रोग्राम खासकरुन बेरोजगार तरुणांसाठी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हे ट्रेनिंग दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि हैदराबाद येथील सेंटरमध्ये असणार आहे. NSDC-अधिकृत प्रशिक्षण केंद्र आणि NSDC स्किलिंग डेटाबेस यासह अनेक स्त्रोतांकडून या तरुणांची निवड केली जाईल. या प्रोग्रामअंतर्गत भाग घेणाऱ्या तरुणांना महिन्याला स्टायपेंडही देण्यात येणार आहे. या ट्रेनिंगच्या शेवटी तरुणांचं मूल्यांकन लॉजिस्टिक सेक्टर स्किल काऊंसिल करणार असून मूल्यांकन झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. तरुणांना सिजनल किंवा फुल टाईम नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.