Amarnath Yatra 2024 : चारधाम यात्रा (Chardham Yatra) सुरु होऊन काही दिवस उलटले असतानाच आणखी एका यात्रेसाठीची उत्सुकता आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. ही यात्रा म्हणजे बाबा बर्फानीचे दर्शन देणारी, अमरनाथ यात्रा. बर्फाच्या कुशीत असणाऱ्या प्रदेशामध्ये एका गुहेत साकारलं जाणारं बर्फाचं शिवलिंग पाहण्यासाठी असंख्य शिवभक्त अमनरनाथ यात्रेसाठी येतात. जवळपास वर्षभर भाविकांना या ठिकाणी प्रवेश मिळण्याची प्रतीक्षा असते आणि आता अखेर तो क्षण नजीक येताना दिसत आहे. कारण, बाबा बर्फानीच्या सर्वच भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे.
यंदाच्या वर्षी अवघ्या काही दिवसांनी म्हणजेच 29 मे रोजी अमरनाथ यात्रा सुरु होणार आहे. 19 ऑगस्ट 2024 पर्यंत ही यात्रा सुरू राहणार असून, सर्व भाविकांना श्री अमरनाथाचं दर्शन घेता येणार आहे. यात्रेसाठी सध्या प्रशासनही संपूर्ण तयारीचा शेवटच्या टप्प्यातील आढावा घेत असून, भाविकांसाठीची नोंदणी प्रक्रियासुद्धा सुरु करण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रेस जाण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांनी सर्वप्रथम नावनोंदणी करणं महत्त्वाचं असेल. ऑनलाईन पद्धतीनं ही नोंदणी करता येत असून, त्याव्यतिरिक्त अमरनाथ श्राईन बोर्डाकडून काही निर्धारित बँकांमध्येही यात्रेकरुंच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू असेल. देवस्थानच्या संकेचस्थळावर यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली असून, इच्छुकांनी https://jksasb.nic.in/ इथं भेट द्यावी असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नाव नोंदणी करताना भाविकांना प्रत्येकी 150 रुपये इतकं शुल्क भरावं लागणार आहे.
अमरनाथ यात्रेच्या यंदाच्या वर्षासाठी 1 जूनपासून हेलिकॉप्टर बुकींग सुरू झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, ऑनलाईन पद्धतीनं यात्रेकरुंना नोंदणी प्रक्रियेमध्ये अडचणी येत असल्यास कोणत्याही शहरातील भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, येस बँक, जम्मू काश्मीर बँकेसह काही सरकारी बँकांच्या शाखांमध्ये यात्रेसाठीची नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, इथं इच्छुकांकडून प्रत्येकी 250 रुपये इतकं नोंदणी शुल्क आकारण्यात येईल.
अमरनाथ धाम समुद्रसपाटीपासून उंचीवर असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये स्थित असल्या कारणानं इथं येणाऱ्यांना ऑक्सिजनच्या कमतरतेपासून काहींना श्वसनाचा त्रासही जाणवतो. ज्यामुळं यात्रेकरुंना काही वैद्यकिय चाचण्यांसह यात्रेला येण्याआधी मेडिकल सर्टिफिकेट देणं बंधनकारक असेल. या वैद्यकिय प्रमाणपत्र अर्थात मेडिकल सर्टिफिकेटसाठी यात्रेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी नजीकच्या सरकारी इस्पितळात जाऊन तेथील डॉक्टरांकडून हे प्रमाणपत्र बनवून घ्यावं. या प्रमाणपत्राच्या पूर्ततेनंतर यात्रेसाठीची नोंदणी शक्य होणार आहे.