लखनऊ : समाजवादी नेते मुलायमसिंह यादव यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अमर सिंह यांनी 'मुलायम सिंह? नको रे बाबा..!' असा पवित्रा घेतला आहे. लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी बोलताना अमर सिंह म्हणाले, या पुढे मी समाजवादी पक्षात जाणार नाही. इतकेच नव्हे तर, मुलायम सिंह यांनी बोलवले तरीही जाणार नाही. शब्दांवर जोर देत, मी समाजवादी पक्षात नाही आणि कधीही असरणार नाही, असे म्हटले. समाजवादी पक्षात चाललेल्या अंतर्गत कलहाबाबत पत्रकारांनी विचारले असता, समाजवादी पक्षातील कोणत्याही गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही. जेव्हा मी पक्षात होतो तेव्हा सगळा दोष काकालाच लावला जायचा, आता मी पक्षा बाहेर आहे, असेही अमर सिंह म्हणाले.
पुढे बोलताना अमर सिंह म्हणाले, आता मी ना नायक आहे ना खलनायक. मुलायम सिंहांबाबत बोलताना अमर सिंह म्हणाले, नेतांजींनी मला दोन वेळा मागचा रस्ता दाखवला आहे. त्या काळात मुलायम सिंह यांनी मला सांगितले होते की, तुम्ही मागच्या दरवाजाने या. जेणेकरून अखिलेश किंवा रामगोपाल तुम्हाला माझ्याकडे येताना पाहणार नाहीत.