नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढत आहे. चीनकडून सतत घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. चीनच्या या घुसखोरीला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान अलर्ट आहेत. लडाखमध्ये तणावाची स्थिती असताना भारत-चीन, भारत-नेपाळ आणि भारत-भूतान सीमेवर देखील सतर्क राहण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने केल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, आयटीबीपी आणि एसएसबी यांना सतर्क केले गेले आहे. त्याअंतर्गत आयटीबीपीच्या उत्तराखंड, अरुणाचल, हिमाचल, लडाख आणि सिक्कीम सीमेवरील जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.
उत्तराखंडच्या कालापानी भागातही दक्षता वाढली आहे. एसएसबीच्या 30 कंपन्या म्हणजे 3000 सैनिकांना भारत-नेपाळ सीमेवर पाठविण्यात आले. यापूर्वी या कंपन्या काश्मीर आणि दिल्लीमध्ये तैनात केल्या गेल्या होत्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सीमा व्यवस्थापन व आयटीबीपीचे सचिव, गृह मंत्रालयातील एसएसबी अधिकाऱ्यामध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर चीन, नेपाळ, भूतानसह इतर सीमांवर दक्षता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चीनने गेल्या तीन दिवसात लडाख सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय सैनिकांनी चीनचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. याआधीही चीन अरुणाचल आणि उत्तराखंड तसेच लडाख सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण करत आहे. भारतीय सैन्य आता अधिक सतर्क झाले आहे.
लडाख सीमेवर भारताने सैनिकांची संख्या वाढविली आहे. सीमावर्ती भागात टँक तैनात करण्यात आले आहेत. दोन्ही देशांचे टँक एकमेकांसमोर आहेत. वाद मिटविण्यासाठी ब्रिगेड कमांडर लेव्हलवर चर्चा सुरु असताना चीन मात्र दुसरीकडे आणखी तणाव वाढवत आहे. चीन विश्वास ठेवावा असा देश नाही. त्यामुळे भारतीय सैन्य अधिक अलर्टवर आहे.