मुंबई : रविवार आज २६ एप्रिल साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया. पहिल्यांदाच लॉकडाऊनच्या काळात अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. गुढी पाडव्यानंतर हा दुसरा सण आहे जेव्हा लोकं घरातच आपले सण साजरे करणार आहेत. लॉकडाऊनमुळे ज्वेलर्सची दुकानं बंद आहेत. यामुळे त्यांना अक्षय तृतीयेला स्वतःहून जाऊन सोनं खरेदी करता येणार नाही. पण त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
ज्यांना आज मुहूर्तावर सोनं खरेदी करायचं आहे ते ऑनलाइन सोनं खरेदी करू शकतात. पण या लॉकडाऊनच्या काळात सोन्याचे दर काय असतील? आणि यावेळी सोनं खरेदी करायला हवं की नको? या संभ्रमात नागरीक आहेत. त्यांच्यासाठी खास ही बातमी.
अक्षय तृतीया वैशाख महिन्यात तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया असते. असं म्हटलं जातं की, भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुरामाचा हा जन्मदिवस आहे. तसेच या दिवशी गणपतीने महाकाव्य महाभारत लिहिण्यास सुरूवात केली. ज्यांना महर्षी वेद व्यास असं म्हटलं जातं.
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची विक्रमी खरेदी केली जात. मात्र यावेळी ते शक्य नाही. यावेळी सोन्याची प्रत्यक्षात खरेदी बंद आहे पण ऑनलाईन सोनं आपण खरेदी करू शकतो. सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. अक्षय तृतीया हा सण हे यंदा संकट समयी आला आहे. याचा फटका सोनं खरेदीला बसला आहे. लॉकडाऊन आणि अर्थव्यवस्थेतील एक शांतता आहे आणि याचा फटका सोनं खरेदीवर झाला आहे.
जगभरात कोरोनामुळे आर्थिक संकट आलं आहे. यामुळे गुंतवणूकदारांची पहिली पसंत ही सोनंच आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जून २०२० पर्यंत भारतात सोन्याचा दर हा ५२,००० रुपये प्रति १० ग्रॅम असणार आहे.