बिहार : लग्नसमारंभ महटलं की वरात आणि वऱ्हाड्यांची भलतीच चर्चा होते. नवरदेव त्याच्या होणाऱ्या पत्नीला म्हणजे नवरीला नेण्यासाठी वरात घेऊन येतो, असंच काहीसं चित्र वरात म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं. पण, नुकतंच एक असं लग्न पार पडलं आहे जिथं वरातीच्या या व्याख्य़ेलाच शह दिला गेला आहे.
बिहारमघील गया येथे मंगळवारी एक अशी वरात आली, जी पाहताना येणारे-जाणारे थक्क झाले. त्यामागचं कारणंही तसंच होतं.
इथं नवरदेव नव्हे, तर चक्क नवरी मुलगी घोड्यावर स्वार होऊन वरात घेऊन आली होती. बँड-बाजा आणि बारात... असच काहीसं चित्र त्यावेळी तिथे हजर असणाऱ्या प्रत्येकानं पाहिलं. फक्त नवरदेवाच्या जागी थाट पाहायला मिळाला नवरीचा.
सूत्रांच्या माहितीनुसार ही नवरी इंडिओ एअरलाईन्समध्ये एअर हॉस्टेस आहे तर, नवरदेव हा कलकत्त्याला एक मोठा व्यावसायिक असल्याचं कळत आहे.
अनुष्का गुहा असं या वधूचं नाव आहे, तर जीत मुखर्जी असं नवऱ्या मुलाचं नाव, लहानपणापासून अनुष्काचं वरात, या संकप्लनेवर विशेष प्रेम.
मुलगाच का घोड्यावरून वरात घेऊन येणार, मुलगी असं का करत नाही असेच प्रश्न ती लहानपणी विचारत असायची. मोठ्यांनी तेव्हा दिलेली उत्तरं तिचं समाधान करु शकत नव्हती.
अखेर तिनं निर्धार केला आणि स्वत:च्या लग्नात ती स्वत:च वरात घेऊन नवऱ्या मुलाकडे गेली. सोशल मीडियावर ही आगळीवेगळी वरात खऱ्या अर्थानं गाजली.