नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावरील टीका तीव्र केल्याने आता काँग्रेसनेही पलटवार करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी गुरुवारी भाजपवर गंभीर आरोप केला. राजीव गांधी यांची हत्या ही भाजपमुळेच झाली, असे ट्विट पटेल यांनी केले आहे.
यामध्ये पटेल यांनी म्हटले आहे की, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर करण्यात येणारी टीका हा शुद्ध भ्याडपणा आहे. मात्र, राजीव गांधींच्या हत्येसाठी कोण जबाबदार होते? भाजपचा पाठिंबा असलेल्या व्ही.पी.सिंह सरकारने राजीव गांधी अतिरिक्त सुरक्षा पुरवायला नकार दिला होता. राजीव गांधी यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली असतानाही त्यांच्या संरक्षणासाठी केवळ एकच खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला होता, याची आठवण पटेल यांनी करुन दिली. मात्र, या माध्यमातून पटेल यांनी भाजपच्या तिरस्कारामुळेच राजीव यांची हत्या झाली, असे सुचवण्याचाही प्रयत्न केला आहे. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळी केंद्रात तिसऱ्या आघाडीचं सरकार होतं. या सरकारला भाजपने बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता भाजप या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Abusing a martyred Prime Minster is the sign of ultimate cowardice
But who is responsible for his assassination ?
The BJP backed VP Singh govt refused to provide him with additional security & left him with one PSO despite credible intelligence inputs and repeated requests
— Ahmed Patel (@ahmedpatel) May 9, 2019
Rajiv ji lost his life due to their hatred & is no longer here amongst us to answer the baseless allegations & abuses which are being unleashed on him
— Ahmed Patel (@ahmedpatel) May 9, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राजीव गांधी यांचा उल्लेख भ्रष्टाचारी नंबर १ असा केला होता. यावर आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. मात्र, त्यानंतरही मोदींनी राजीव गांधी यांच्यावर टीका करणे सुरुच ठेवले होते. दिल्लीत बुधवारी झालेल्या प्रचारसभेतही त्यांनी राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी भारतीय नौदलातील INS विराटचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केल्याचा खळबळजनक आरोप केला होता.