Vivek Agnihotri: ...अन् 'काश्मीर फाइल्स' फेम विवेक अग्निहोत्रींनी मागितली कोर्टाची बिनशर्त माफी

Vivek Agnihotri Unconditional Apology: भीमा कोरेगाव प्रकरणासंदर्भात केलेल्या एका विधानामुळे विवेक अग्निहोत्री अडचणीत आले. त्यांनी आज कोर्टासमोर माफी मागितली आहे.

Updated: Apr 10, 2023, 05:04 PM IST
Vivek Agnihotri: ...अन् 'काश्मीर फाइल्स' फेम विवेक अग्निहोत्रींनी मागितली कोर्टाची बिनशर्त माफी title=
Vivek Agnihotri Delhi High Court

Vivek Agnihotri unconditional apology: 'द काश्मीर फाइल्स' फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. 2018 साली न्यायमूर्ती एस. मुलरीधर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयासमोर हजर होऊन अग्निहोत्री यांनी माफी मागितली. अग्निहोत्री यांनी 2018 साली न्या. मुरलीधर यांच्यावर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणामध्ये गौतम नवलखा यांना पक्षपात करुन दिलासा दिल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणामध्ये अग्निहोत्री यांनी कोर्टासमोर हजर होऊन माफी मागितली.

कोर्टाने स्वत: घेतली दखल

विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये दिल्ली हायकोर्टाने स्वत: दाखल करुन घेत विवेक अग्निहोत्री आणि वैज्ञानिक आनंद रंगनाथन यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती. या दोघांनीही प्रत्यक्ष कोर्टासमोर येऊन खुलासा करावा असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. याच नोटीशीनंतर विवेक अग्निहोत्रींनी मागितलेली माफी मान्य केली आहे. याचबरोबर कोर्टाने विवेक अग्निहोत्रींविरोधातील अवमान केल्याची कारवाई रद्द केली आहे. तसेच यापुढे अशाप्रकारची विधानं करु नये अशी समजही अग्निहोत्रींना कोर्टाने दिली आहे.

अन्य लोकांनाही नोटीस

न्यायव्यवस्थेसंदर्भात आपल्या मनात फार सन्मान असल्याचं अग्निहोत्री यांनी कोर्टाला सांगितल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. कोर्टाचा जाणूनबुजून अपमान करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असंही अग्निहोत्री यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे वैज्ञानिक आनंद रंगनाथन यांची बाजू कोर्टासमोर वकील जे. साई दीपक यांनी मांडली. आनंद रंगनाथन पुढील सुनावणीला म्हणजेच 24 मे 2023 रोजी कोर्टासमोर हजर राहतील असं म्हटलं आहे. विवेक अग्निहोत्री, आनंद रंगनाथन आणि इतर लोकांविरोधात न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्याविरोधात केलेल्या विधानांच्या प्रकरणी स्वत: दखल घेत गुन्हेगारी स्वरुपात अवमान केल्याची याचिका दाखल करुन घेतली.

सादर केलेलं प्रतिज्ञापत्र

मागील वर्षी म्हणजेच 2022 साली 6 डिसेंबर रोजी या प्रकरणासंदर्भात अग्निहोत्री यांनी कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. यामध्ये त्यांनी कोणत्याही अटीशिवाय माफी मागण्याबरोबरच वैयक्तिक स्तरावर पश्चाताप होत असल्याचं म्हटलं होतं. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणामधील आरोपी असलेल्या गौतम नवलखा यांच्याविरोधात ट्रांझिट रिमांड ऑर्डर रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात गुरुमूर्ति यांनी लिहिलेल्या एका लेखाच्या समर्थनार्थ केलेल्या एका ट्विटमुळे हे प्रकरण तापलं. अवमानना प्रकरणामध्ये आता अग्निहोत्री यांनी माफी मागितली आहे. गुरुमूर्ती हे चेन्नईमधील 'तुगलक' नावाच्या मासिकेचे संपादक आहेत. त्यांच्याविरोधातही कोर्टाचा अवमान केल्याचा खटला चालवण्यात आला.