'अभविप'च्या कार्यकर्त्यांना गांधीगिरीने रोखणारे 'ते' प्राध्यापक अचानक रजेवर

 गुप्ता हे देशद्रोही असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

Updated: Sep 27, 2018, 04:32 PM IST
'अभविप'च्या कार्यकर्त्यांना गांधीगिरीने रोखणारे 'ते' प्राध्यापक अचानक रजेवर  title=

भोपाळ: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभविप) कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यापासून रोखणारे मंदसौर येथील सरकारी महाविद्यालयातील प्राध्यापक दिनेश गुप्ता अचानकपणे रजेवर गेले आहेत. 'अभविप'च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप केला होता. दिनेश गुप्ता यांनी आपल्याला 'वंदे मातरम', 'भारत माता की जय' घोषणा देण्यापासून रोखले, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. 

'अभविप'चे कार्यकर्ते घोषणा देत असताना दिनेश गुप्ता वर्गात शिकवत होते. त्यावेळी अभिवपचे कार्यकर्ते प्राचार्यांकडे निवेदन देण्यासाठी चालले होते. या कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणा दिल्या जात होत्या. तेव्हा दिनेश गुप्ता यांनी शिकवण्यात अडथळा येत असल्यामुळे या कार्यकर्त्यांना शांत बसण्यास सांगितले. 

मात्र, 'अभविप'च्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गुप्ता यांनी आपल्याला 'वंदे मातरम', 'भारत माता की जय' घोषणा देण्यापासून रोखले. त्यामुळे गुप्ता हे देशद्रोही असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचाही इशारा दिला होता. 

तर दुसरीकडे एका स्थानिक वृत्तवाहिनीने या घटनेचा एक व्हीडिओ प्रसारित केला आहे. या व्हीडिओमध्ये दिनेश गुप्ता अभिवपच्या कार्यकर्त्यांचे पाय पकडताना दिसत आहेत. गुप्ता यांच्या गांधीगिरीमुळे अभविपच्या अनेक कार्यकर्त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. मात्र, गुरुवारी प्राध्यापक गुप्ता यांनी अचानकपणे तीन दिवसांच्या सुट्टीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.