Aadhaar-PAN Linking: 31 मार्चपर्यंत आधार कार्ड आणि पॅन लिंक केलं नाही तर काय होणार? नंतर येईल पश्चात्तापाची वेळ

Aadhaar-PAN Linking Last Date 31 March: तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (Aadhar Pan Linking) करा असं आवाहन सरकार वारंवार करत असतं. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करत असतात. जर तुम्हीही अशाप्रकारे दुर्लक्ष करत असाल तर त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुदत संपण्याआधी आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करुन घ्या.   

Updated: Mar 11, 2023, 03:17 PM IST
Aadhaar-PAN Linking: 31 मार्चपर्यंत आधार कार्ड आणि पॅन लिंक केलं नाही तर काय होणार? नंतर येईल पश्चात्तापाची वेळ title=

Aadhaar-PAN Linking: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (Central Board of Direct Taxes) वारंवार आपलं आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) लिंक करण्याचं आवाहन करत असतं. पण अनेकजण याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असतात. याचं कारण म्हणजे असं न केल्यास यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची अनेकांना जाणीव नसते. पण यामागे आर्थिक व्यवहार (Financial Transaction) सुरळीत होणं तसंच कर चुकवेगिरी (Tax Evasion) रोखणं अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 31 मार्च 2023 च्या आधी आपलं आधार आणि पॅन लिंक करा असं आवाहन केलं आहे. 

जर तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड हे निष्क्रीय होईल. याचा अर्थ कोणत्याही आर्थिक व्यवहारात तुम्हाला त्याचा वापर करता येणार आहे. सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानेही (SEBI) यासंदर्भात माहिती दिली आहे. मुदतीपूर्वी जर तुम्ही आधार पॅनशी लिंक केलं नाही तर तुम्ही NSE आणि BSE सारख्या आर्थिक बाजारपेठांमध्ये कोणतेही व्यवहार करु शकणार नाही. 

आधार आणि पॅन लिंक करणं अनिवार्य आहे का? 

प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, आधार आणि पॅन कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. तुमच्या पॅन कार्डचं डुप्लिकेशन रोखण्यासाठी हे महत्त्वाचं असतं. एकाच व्यक्तीकडे अनेक पॅन कार्ड आढळल्यानंतर तसंच एकच पॅन क्रमांक अनेक व्यक्तींना देण्यात आल्यानंतर प्राप्तिकर विभागाने ही घोषणा केली होती.

जर तुम्ही आधार कार्ड पॅनशी लिंक केलं तर, सरकार करदात्यांची ओळख पटवू शकतं. तसंच कर चुकवेगिरी रोखू शकतं आणि कराशी संबंधित नियमांचं पालन होत आहे याची खबरदारी घेऊ शकतं. 

आधार आणि पॅन लिंक करणं सर्वांनाच अनिवार्य आहे का?

आधार आणि पॅन लिंक करणं सर्व भारतीयांसाठी अनिवार्य असलं तरी काहींना मात्र यातून सूट देण्यात आली आहे. काही श्रेणीतील लोकांना आधार आणि पॅन लिंक करणं अनिवार्य नाही. 

80 पेक्षा जास्त वय असणारे आणि प्राप्तिकर कायद्यानुसार अनिवासी असणाऱ्या नागरिकांना आधार-पॅन लिंक करण्याची गरज नाही. तसंच भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांनाही यातून सूट आहे. 

आधार-पॅन कधीपर्यंत लिंक करायचं आहे?

आधार आणि पॅन मोफत लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 ही शेवटची तारीख होती. आता ही मुदत 31 मार्च 2023 पर्यंत आहे. पण करदात्यांना यासाठी 1 हजार रुपये भरावे लागणार आहेत. 

मुदतीपूर्वी आधार आणि पॅन लिंक नाही केलं तर काय होणार?

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आधार आणि पॅन लिंक करणं अनिवार्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. जर तसं केलं नाही तर पॅन निष्क्रीय होईल. जर पॅन निष्क्रीय झालं तर संबंधित व्यक्ती आयकर परतावा भरु शकत नाही. तसंच रिफंड जारी करण्यास असक्षम असतील. याशिवाय डिफेक्टिव्ह रिटर्न्ससारखी प्रलंबित कामं पूर्ण होणार नाहीत. 

आधार आणि पॅन नेमकं लिंक कसं करायचं?

1) प्राप्तिकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in. या पोर्टलवर जा. 

2) ‘Link Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.

3) तुमचं पॅन, आधार क्रमांक आणि आधार कार्डवर नमूद आहे त्याप्रमाणे नाव तेथील रकान्यांमध्ये भरा.

4) भरलेली माहिती तपासा आणि submit बटणवर क्लिक करा. 

तुम्ही माहिती भरुन सबमिट केल्यानंतर डिस्प्लेवर लिंक यशस्वी झाल्याचा संदेश येईल. यानंर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.