आपल्या कर्माचं फळ ईश्वर याच जन्मात आपल्याला देतो असं म्हणतात. दिल्लीतील गाजियाबाद येथील एका घटनेनंतर याची प्रचिती आली आहे. याचं कारण चोरी करुन पळून जाणाऱ्या एका चोराचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. चोरी केल्यानंतर चोर छतावरुन पळून जात असताना वीजेच्या तारेच्या संपर्कात आला आहे. वीजेचा धक्का इतका जबरदस्त होती की, त्याचा तिथेच मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्याजवळचं चोरीचं सर्व सामान जप्त केलं आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रातून त्याची ओळख पटली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहादूरगड येथील गाव रझैटी येथे राहणारे जावेद यांनी सांगितलं आहे की, गतवर्षीपासून ते गावातील शेखपूर खिजरा येथील नियाज कॉलनीत आपल्या पत्नी आणि मुलासह वास्तव्यास आहेत. एका फॅक्टरीतील ट्रान्सपोर्टरकडे तो ड्रायव्हर म्हणून काम करतो.
शनिवारी रात्री जावेद आपली पत्नी आणि मुलांसह घऱात झोपले होते. घऱाच्या एका खोलीत हे सर्वजण झोपले होते. यावेळी घराचा मुख्य गेट बंद होता. सकाळी जवळपास 6 वाजता पत्नी उठली असता घराचे दरवाजे उघडे असल्याचं तिला दिसलं. तसंच सर्व सामान विखुरलेलं होतं. यानंतर पत्नीने घराच्या छतावर जाऊन पाहिलं असता तिथे एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता. हे पाहिल्यानंतर ती घाबरली आणि धावत खाली आली.
घाबरलेल्या पत्नीने जावेद यांना उठवलं आणि सगळा घटनाक्रम सांगितला. यानंतर जावेद यांनी छतावर धाव घेतली असता तिथे एक मृतदेह होता. त्यांनी तात्काळ शेजारी आणि पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन झडती घेतली असता त्याच्याकडे चार मोबाइल, घड्याळ, सोनं आणि चांदीचे दागिने सापडले. याशिवाय 25 हजार रोख रुपये आणि एक ओळखपत्र आढळलं. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असून, त्याच्या कुटुंबीयांना कळवलं आहे.
पोलीस अधिकारी देवेंद्र कुमार यांनी सांगितलं आहे की, आरोपी याआधीही अशा चोरीच्या प्रकरणांमध्ये सापडला असून अटक झाली होती. चोरी करुन पळून जाताना वीजेचा झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.