Delhi Rain: राजधानी दिल्लीत (Delhi) पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे सर्व यंत्रणा कोलमडली असून ठिकठिकाणी पाणी भरलं आहे. रस्त्यांपासून ते अनेक गल्ल्या, अंडरपास पाण्याखाली बुडाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या असून, पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलं आहे. दरम्यान, परिस्थितीशी तोंड देण्यासाठी दिल्ली सरकारने सर्व मनुष्यबळ कामाला लावलं आहे. दिल्ली सरकारने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द केली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन सर्व परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्लीत (Delhi) तब्बल 41 वर्षांनी रेकॉर्डब्रेक पाऊस (Rain) झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 24 तासात 153 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 1982 नंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
पावसामुळे प्रशासनासमोरील मोठं आव्हान उभं राहिलं आहेत. दरम्यान प्रशासनही अॅक्शन मोडवर आलं आहे. सरकारने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाणी भरलेल्या ठिकाणी जाऊन आढावा घेण्याचा आदेश दिला आहे. तसंच परिसरांची स्वच्छता करण्याचा आदेश दिला आहे. महापौर आणि मंत्र्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, शनिवारी दिल्लीत 126 मिमी पाऊस झाला. पावसाळी हंगामातील 15 टक्के पाऊस गेल्या 12 तासात कोसळला आहे. ठिकठिकाणी पाणी भरलं असल्याने लोकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. आज (रविवार) दिल्लीमधील सर्व मंत्री आणि महापौर पावसाचा फटका बसलेल्या परिसरांचं निरीक्षण करतील. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना मैदानात उतरण्यास सांगण्यात आलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि मान्सून वाऱ्यांमुळे उत्तर पश्चिम भारतात जोरदार पाऊस होत आहे. यामध्ये दिल्लीचाही सहभाग आहे. येथे हंगामातील पहिल्या मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. 41 वर्षांनी असा पाऊस झाला आहे. IMD चं म्हणणं आहे की, दिल्लीच्या सफदरजंग वेधशाळेत रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंक 24 तासात 153 मिमी पावसाची नोंद झाली. याआधी 25 जुलै 1982 ला 24 तासात 169.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
याआधी दिल्लीत 10 जुलै 2003 रोजी 133.4 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर 21 जुलै 1958 ला आतापर्यंतच्या रेकॉर्डब्रेक 266.2 मिमी पावसाची नोंद झाली होती. सध्या हवामान विभागाने यल्लो अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याचा इशारा आहे. अशात दिल्लीमधील लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.