शैल पर्वतरांगेतील शिवलिंगावर होतोय नैसर्गिकरीत्या जलाभिषेक, जाणून घ्या काय आहे रहस्य...

शैल पर्वत क्षेत्रात गंगोलीहाट गुहा हे गुहांसाठी प्रसिद्ध आहे. येथे एका विशाल गुहा चार स्थानिक तरुणांनी शोधून काढली आहे.  

Updated: May 20, 2022, 03:44 PM IST
शैल पर्वतरांगेतील शिवलिंगावर होतोय नैसर्गिकरीत्या जलाभिषेक, जाणून घ्या काय आहे रहस्य... title=

देहराडून : शैल पर्वत क्षेत्रात गंगोलीहाट येथे अनेक मोठ्या आणि विशाल गुहा आहेत. मात्र, सिद्धपीठ हाटकालिका मंदिरापासून सुमारे एक किमी अंतरावर या गुहांपेक्षा आणखी एक मोठी गुहा चार स्थानिक तरुणांनी शोधून काढली आहे.

गंगोलीहाटच्या गंगावली वंडर्स ग्रुपचे सुरेंद्र सिंह बिष्ट, ऋषभ रावल, भूपेश पंत आणि पप्पू रावल यांना ही गुहा सापडली आहे. त्या गुहेचा आकार पाहून ते आश्चर्यचकित झाले. या गुहेला आठ तळ असून आतमध्ये विविध पौराणिक चित्रे कोरलेली आहेत. यात शेषनाग, अन्य पौराणिक देवी, देवता यांची चित्रे आहेत.

याबाबत माहिती देताना टीम लीडर सुरेंद्र स‍िंह म्हणाले, या गुहेत सुमारे 35 फूट खोल खाली उतरलो. त्यानंतर त्यांना नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या आठ फुटांच्या पायऱ्या मिळाल्या. पुढे गेल्यावर त्यांना आणखी एक तळ सापडला. मात्र, आमच्याकडे कमी प्रकाश असलेले टॉर्च होते, तसेच दोऱ्याही कमी होत्या. त्यामुळे आम्ही त्यात उतरू शकलो नाही.

स्थानिक तरुणांनी शोधून काढलेली ही गुहा सुमारे 200 मीटर लांब आहे. या गुहेत पुरेसा ऑक्सिजन असून पर्यटनाच्या दृष्टीने ही गुहा मैलाचा दगड ठरू शकते, असे या तरुणांनी सांगितले.

गंगावली क्षेत्रातील शैल पर्वत शिखर रांगांमध्ये 21 गुहा असल्याचाच उल्लेख मानस खंडामध्ये करण्यात आला आहे. त्यापैकी 10 गुहांचा शोध आतापर्यंत लागला आहे. आतापर्यंत पाताळ भुवनेश्वर, कोटेश्वर, भोलेश्वर, महेश्वर, लाटेश्वर, मुक्तेश्वर, सप्तेश्वर, डाणेश्वर, भुगतुंग (भृगु संहिता इथे लिहिली गेली असे मानले जाते) अशा गुहा सापडल्या आहेत.

सिद्धपीठ हाट कालिका मंदिराच्या आसपास सापडलेल्या या गुहेशिवाय अन्य तीन गुहा येथे असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, नव्याने सापडलेल्या गुहेचा शोध घेण्याऱ्यांनी तिचे नामकरण महाकालेश्वर असे केले आहे.

प्रसिद्ध पाताल भुवनेश्वर गुहेपेक्षा ही गुहा मोठी असू शकते, अशी माहिती देतानाच या तरुणांनी या गुहेत एक शिवलिंग असून त्यावर नैसर्गिकरित्या जलाभिषेक होत असल्याचे सांगितले. या जलाभिषेक होणाऱ्या जागेचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु, आमचा प्रयत्न निष्फळ झाल्याचे ते म्हणाले.

या गुहेबद्दल एक वर्षांपूर्वी दीपक रावल यांना माहिती मिळाली होती. त्यावेळीही एक प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी आवश्यक साधने जवळ नव्हती त्यामुळे ही शोध मोहीम हाती घेतली नाही. यानंतर सर्व तयारी करून आम्ही आतपर्यंत पोहोचलो. पण, ही गुहा खूपच मोठी असल्याने नववा तळ गाठता आला नाही. आता पुन्हा या गुहेमध्ये शोध मोहीम हाती घेणार असल्याचे टीम लीडर सुरेंद्र स‍िंह यांनी सांगितले.