अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेली मुलगी रस्त्यावर भूकेने तडफडताना आढळली; आईची मोदी सरकारकडे मदतीसाठी हाक

Telangana Girl in US: अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेली भारतीय तरुणी शिकागोमधील रस्त्यांवर आढळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती भुकेली असल्याची माहिती मिळत आहे. तिचं सामान चोरी झालं असून, मानसिक स्थिती बिघडली असल्याचं समजत आहे. दरम्यान, मुलीच्या आईने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 27, 2023, 12:51 PM IST
अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेली मुलगी रस्त्यावर भूकेने तडफडताना आढळली; आईची मोदी सरकारकडे मदतीसाठी हाक title=

Telangana Girl in US: परदेशात आपल्या मुलाला शिक्षणाला पाठवणं हे अनेक पालकांचं स्वप्नं असतं. अनेकदा आपल्या आवाक्याबाहेर असतानाही मध्यमवर्गीय कुटुंबं एकवेळ कर्ज काढत मुलांना परदेशात पाठवतात. पण तिथे गेल्यानंतर मुलांना स्वत: सगळा संघर्ष करावा लागतो. अनेकदा मागे देशात असणाऱ्या कुटुंबाना मुलांची तिथे नेमकी काय स्थिती आहे याची कल्पना नसते. पण जेव्हा कळतं तोपर्यंत बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असतं. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली असून तेलंगणामधील मुलगी अमेरिकेतील रस्त्यांवर आढळली आहे. आता तिच्या आईने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. 

अमेरिकेत मास्टर्सचं शिक्षण करण्यासाठी गेलेली तेलंगणामधील मुलगी शिकागोतील रस्त्यांवर भुकेने तडपडताना आढळली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, लेकीला परत भारतात आणण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. 

मुलीचं नाव सैय्यदा लुलू मिन्हाज जैदी असं आहे. ती तेलंगणाच्या मेडचल जिल्ह्यात वास्तव्याला आहे. ऑगस्ट 2021 मध्ये ती शिकागोतील डेट्रॉइटच्या ट्राइन युनिव्हर्सिटीत माहितीशास्त्रात पदवी घेण्यासाठी गेली होती. तिथे शिक्षण घेताना ती नेहमी आपल्या आईच्या संपर्कात होती. पण गेल्या दोन महिन्यांपासून तिचा संपर्क तुटला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबामधील दोन तरुणांनीच कुंटुंबाला मुलीला फार मोठा धक्का बसला असल्याचं कुटुंबाला सांगितलं आहे. तिचं सर्व सामान चोरी झालं असून, तिला एकवेळचं अन्नही मिळत नाही आहे. यानंतर मुलीच्या आईने परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. भारतीय दुतावासाच्या माध्यमातून तात्काळ हस्तक्षेप करत लवकरात लवकर मुलीला भारतात आणा अशी विनंती त्यांनी एस जयशंकर यांच्याकडे केली आहे. 

एएनआयच्या रिपोर्टनुसार, मजलिस बचाओ तहरीकचे (MBT) नेते अमजदुल्ला खान यांचं एक ट्वीट समोर आलं आहे. यामध्ये त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती मिन्हाजला तिचं नाव विचारताना दिसत आहे. तसंच तिला मदतीचं आश्वासन देत, तिच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्याचं आश्वासन देत आहे. तो मिन्हाजला पुन्हा भारतात जाण्याचा सल्लाही देत आहे. 

दरम्यान शिकागोमधील भारतीय दुतावासाने अमजदुल्ला खान यांच्या ट्वीटवर उत्तर दिलं आहे. आम्हाला सैय्यद लुलू मिन्हाजसंदर्भात माहिती मिळाली आहे. तुम्ही आमच्या संपर्कात राहा असं भारतीय दुतावासाने सांगितलं आहे.